भारतीय संघातून स्थान गमावलेल्या सुरेश रैनाच्या गुडघ्यावर काही दिवसांपूर्वीच दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे क्रिकेटपासून आणखी काही आठवडय़ांसाठी दूर राहावे लागणार, हे माहीत असल्याने हा निर्णय स्वत:ला पटवून देणे आव्हानात्मक असल्याचे मत रैनाने व्यक्त केले.

३२ वर्षीय रैनाच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असून यामधून सावरण्यासाठी त्याला किमान सहा आठवडय़ांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत क्रिकेट मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांना रैनाला मुकावे लागणार आहे.

‘‘खरे सांगायचे तर गुडघ्यावर करण्यात आलेल्या या दुसऱ्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेणे माझ्यासाठी फार आव्हानात्मक होते. कारण यामुळे मला क्रिकेटपासून दूर राहावे लागणार, याची कल्पना होती. काही आठवडय़ांपूर्वीच मला या गोष्टीची जाणीव झाली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे, हेसुद्धा मला ठाऊक होते,’’ असे रैना म्हणाला.

१८ कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ७८ ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या रैनाने जुलै २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतासाठी अखेरचा एकदिवसीय सामना खेळला आहे. त्याशिवाय रैनाच्या गुडघ्यावर यापूर्वी २००७ मध्येही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

‘‘गुडघ्याच्या दुखापतींनी मला नेहमीच सतावले आहे. सरावतज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे मी यातून वारंवार सावरलो. त्याचप्रमाणे आताही सावरून लवकरात लवकर मैदानावर परतेन, अशी आशा करतो,’’ असेही रैनाने सांगितले.