नवी आव्हाने घेऊन आलेल्या ‘रेड दी हिमालया’ या मोटार शर्यतीने पहिल्याच दिवशी स्पर्धकांची कसोटी पाहिली. शिमला ते मनाली या घाटमाथ्यावरील आव्हानामध्ये दुचाकी गटात अरविंद के.पी., तर मोटार एक्ट्रीम गटात नव वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या सुरेश राणा यांनी वर्चस्व गाजवले.
उंच शिखरावर घेण्यात येणाऱ्या भारतातील या एकमेव मोटार शर्यतीत खेळाडूंच्या शारीरिक, मानसिक तयारीची खरी कसोटी लागते. कधी घनदाट जंगलातून जाणारा मार्ग, तर कधी चिंचोळ्या रस्ता अशा अडचणींचा सामना करीत शर्यतपटूंसमोर शर्यत पूर्ण करण्याचे लक्ष्य असते.
अशाच डलॉग ते चमोला या १९.६१ किलोमीटरच्या अंतरातील पहिल्या टप्प्यात शर्यतपटूंना चिंचोळ्या नागमोडय़ा मार्गातून वाट काढावी लागत होती. सतलज नदीच्या किनाऱ्यावरून जाणाऱ्या या मार्गावर अरविंद आणि सुरेश यांनी सहज आगेकूच केली, परंतु लुहरी ते बेहरा या मार्गावर त्यांचा कस लागला. खडकाळ रस्त्यावरून जाणाऱ्या या मार्गावर सर्व स्पर्धकांची कसोटी लागली.
मोटार एक्ट्रीम गटात सुरेश राणाला राज सिंग राठोड आणि हरप्रीत एस. बावा यांनी, तर दुचाकी गटात अरविंदला नटराज आर आणि आशिष सौरभ मुदगील यांनी कडवी झुंज दिली. या खडकाळ रस्त्यावरून घाट चढताना सुरक्षा भिंत नसल्याने स्पर्धकांना जीव मुठीत ठेवून लक्ष्याचा पाठलाग करावा लागत होता. अशा वेळी त्यांची समयसूचकताच त्यांना यश मिळवून देत होती. त्या पुढील चिमनी व खनाग या मार्गावरही अशाच कसोटींचा सामना करीत स्पर्धकांनी पहिला टप्पा पूर्ण केला.