स्पर्धात्मकतेचा अनुभव घेण्यासाठी मैदानावर शाब्दीक वादावादी, संघर्ष करण्याची गरज नाही असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले होते. पण कोहलीच्या या विधानावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला अजिबात विश्वास नाहीय. विराट कोहली ऑस्ट्रेलियात येऊन शांत राहिला तर आपल्याला आश्चर्य वाटेल. तो स्पर्धक असून त्यात तो यशस्वी सुद्धा होतो असे कमिन्स फेअरफॅक्स मीडियाशी बोलताना म्हणाला.

भारतीय कर्णधाराबरोबर शाब्दीक वादावादी झाली तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही स्पर्धात्मक क्रिकेट खेळणार असून विराटला अन्य खेळाडूंपेक्षा वेगळी वागणूक देणार नाही असे कमिन्सने सांगितले. तुम्हाला दोन्ही बाजूंकडून आवेशयुक्त, उत्कंठावर्धक क्रिकेट पाहायला मिळेल पण काही वर्षांपूर्वी भारताविरुद्ध खेळताना जसा तणाव होता तशा पद्धतीचे हे क्रिकेट नसेल असे कमिन्सने स्पष्ट केले.

मागच्यावर्षी बंगळुरुमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने निर्णयाचा फेरआढावा घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रुमकडे मदत मागून नियम मोडला होता. त्यावेळी दोन्ही संघांमधील संबंध आणखी बिघडले होते. भारत ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा कसोटी मालिकेत २-० असा मानहानीकारक पराभव झाला होता.