आयपीएलच्या तेराव्या हंगामादरम्यान भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली. गेली काही वर्ष सातत्याने चांगली कामगिरी करत असतानाही मुंबईच्या सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान नाकारण्यात आलं. यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गहजबही झाला. अनेक भारतीय चाहत्यांनी बीसीसीआयविरोधघात आपली नाराजीही व्यक्त केली. त्यातच RCB विरुद्ध सामन्यादरम्यान सूर्यकुमार आणि विराटमध्ये रंगलेल्या द्वंद्वामुळे या गोष्टीला वेगळंच वळण मिळालं.

भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे थोडीशी निराशा आल्याचं सूर्यकुमारने मान्य केलं. परंतू आयपीएलदरम्यान विराट आणि आपल्यात घडलेला तो प्रकार क्षणिक असल्याचंही सूर्यकुमार म्हणाला. अनेक दिग्गज माजी खेळाडूंनी सूर्यकुमारला संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या सर्व प्रकरणानंतर…पुढे जात राहणं भाग आहे. थांबण्यासाठी इथपर्यंत आलेलो नाही अशा आशयाचं ट्विट सूर्यकुमारने केलं आहे.

३० वर्षीय सूर्यकुमारने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये चार अर्धशतकांसह ४८० धावा केल्या. त्याशिवाय सय्यद मुश्ताक अली आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतही गेल्या दोन हंगामांपासून तो सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी किमान ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात आपली निवड होईल, अशी सूर्यकुमारला अपेक्षा होती. ‘‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघनिवडीची घोषणा झाली त्यावेळी मी आणि रोहित जिममध्ये व्यायाम करत होतो. स्वत:ची निवड न झाल्याचे कळताच पुढील काही काळ मी फार शांत तसेच निराश झालो होतो. मात्र त्यावेळी रोहितने सर्वप्रथम माझ्याशी संवाद साधला. ‘इतक्या सहज हार मानू नकोस. तुझे कार्य करत राहा, तुला नक्कीच फळ मिळेल. मीसुद्धा या प्रकारच्या परिस्थितीतून मार्गक्रमण केले आहे’, अशा आशयाचे रोहितचे शब्द मला धीर देणारे ठरले,’’ असे सूर्यकुमार म्हणाला.