इंग्लंडविरोधातील चौथ्या टी-२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादवने अर्धशतक साजरं करत सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडलं. सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आणि धडाकेबाज खेळी साकारली. सूर्यकुमारने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे भारताला ८ बाद १८५ अशी समाधानकारक धावसंख्या उभारती आली. भारताने इंग्लंडला १७७ धावांमध्ये रोखलं आणि आठ धावांनी सामना जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली.

सामना संपल्यानंतर सूर्यकुमारने प्रतिक्रिया देताना, भारतासाठी सामने जिंकणं हे नेहमीच आपलं स्वप्न होतं, आणि ते सत्यात उतरणं आपल्यासाठी आनंददायी आहे असं सांगितलं. पुढे तो म्हणाला की, “ज्यापद्धतीने सर्व गोष्टी पार पडल्या त्यावर मी समाधानी आहे. मी नेहमीच भारतासाठी खेळण्याचं आणि जिंकण्याचं स्वप्न पाहिलं आहे”.

सूर्यकुमार यादवने मिळालेल्या संधीचं सोन केलं. सूर्यकुमारच्या तेजस्वी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा आठ धावांनी पराभव केला. यासोबत भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-२ ने बरोबरी साधली आहे.

इशान किशन जखमी असल्याने त्याच्या जागी सूर्यकुमारला संधी देण्यात आली आहे. सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. मैदानात उतरताच सूर्यकुमारने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर षटकार खेचला आणि सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यानंतर सूर्यकुमार थांबला नाही आणि आपली खेळी दर्शवत ३१ चेंडूत ५७ धावा केल्या. यावेळी त्याने तीन षटकार आणि सहा चौकार लगावले.

सूर्यकुमारच्या विकेटवरुन वाद
सॅम कॅरनच्या १४ व्या षटकात डेव्हिड मलानने सूर्यकुमारचा झेल घेताना हात मैदानाला टेकवले होते. पण मैदानावरील पंचांचा निर्णयच तिसऱ्या पंचांनी योग्य ठरवला. यावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

विराट कोहलीने काय सल्ला दिला होता?
इशान किशन ज्याप्रकारे निर्धास्तपणे पहिल्या सामन्यात खेळत होता त्याचप्रकारे सूर्यकुमार यादवदेखील अजिबात दडपण न घेता खेळला. कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेला सर्व श्रेय देताना सूर्यकुमारने सांगितलं की, वरिष्ठांनी इतकी वर्ष खेळणाऱ्या एखाद्या संघासोबत खेळत असल्याप्रमाणेच खेळ असा सल्ला दिला होता.

“मी जसा आहे तसाच राहण्याचा प्रयत्न करत आहे, स्वत:शी बोलतो, गोष्टी साध्या ठेवणे….यामुळे मला सर्व सहज होतं. संघ व्यवस्थापन आणि विराटने मला मैदानात जाऊन स्वत:ला व्यक्त कर असं सांगितलं होतं, आयपीएलमध्ये खेळत आहेस त्याप्रमाणे खेळ, फक्त कपड्यांचा रंग वेगळा आहे,” अशी माहिती सूर्यकुमारने दिली.