भारतीय संघात स्थान न मिळालेल्या सूर्यकुमार यादवने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधातील सामन्यात तडाखेबंद फलंदाजी करत पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची दखल घेण्यास सर्वांना भाग पाडलं. सूर्यकुमार यादवच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चीत केलं आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर पाच गडी राखून मात केली. दरम्यान सूर्यकुमारची फलंदाजी पाहून न्यूझीलंडच्या माजी खेळाडू स्कॉट स्यायरिस याने त्याला ऑफर दिली आहे.

स्कॉट स्यायरिस याने सूर्यकुमार यादवला वेगळ्या संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला आवडेल का अशी विचारणा केली आहे. सूर्यकुमार यादवने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधात केलेल्या जबरदस्त फलंदाजीनंतर स्कॉट स्यायरिसने ही विचारणा केली आहे. सूर्यकुमार यादवने फक्त ४३ चेंडूत ७९ धावा करत १६५ धावांचं आव्हान पाच चेंडू राखत सहजपणे पूर्ण केलं.

सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर आला तेव्हा सहा ओव्हर्समध्ये ३७ धावांवर एक विकेट अशी स्थिती होती. दुसऱ्या बाजूला विकेट पडत असताना सूर्यकुमार यादव मात्र संघाला विजय मिळेपर्यंत फलंदाजी करत होता. अखरेच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत सूर्यकुमार यादवने विजयावर शिक्कामोर्तब केलं.

यानंतर स्कॉट स्यायरिसने ट्विट केलं आणि म्हटलं की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या इच्छेपोटी सूर्यकुमार यादवने कदाचीत दुसऱ्या देशाकडून खेळण्याचा निर्णय घेतला तर…”.

सूर्यकुमार यादव उत्तम फलंदाजी करत असतानाही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.