गेल्याच आठवड्यात संपलेल्या IPL 2020 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवत पाचव्यांदा किताब आपल्या नावे केला. या विजयात अनेक खेळाडूंचा मोलाचा वाटा उचलला. सूर्यकुमार यादव हे यंदाच्या हंगामातील चर्चेत असलेलं नाव ठरलं. सूर्यकुमारने कामगिरीत सातत्य राखत १६ सामन्यांमध्ये ४८० धावा ठोकल्या. परंतु टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मात्र त्याला संधी मिळाली नाही. याच मुद्द्यावरून त्याला प्रचंड पाठिंबा मिळताना अजूनही दिसतो आहे. अशातच सूर्यकुमार आणि विराट कोहली यांच्या संदर्भात एक गोष्ट घडली आहे.

ऑस्ट्रेलिया दोऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर झाल्यावर लगेच विराटच्या RCBशी मुंबईचा सामना झाला. त्यात सूर्यकुमारने धडाकेबाज खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. विराट आणि सूर्यकुमार यांच्यात मैदानावर नजरानजरही झाली, पण सूर्यकुमारने आपल्या कामगिरीच्या माध्यमातून त्याला उत्तर दिलं. त्यामुळे नेटिझन्सदेखील सूर्यकुमारच्या बाजूने उभे राहिले. पण सध्या घडलेल्या प्रकारात मात्र सूर्यकुमार चुकीच्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

सोशल मीडियामधील एका फॅन पेजवर रोहित शर्माच्या नेतृत्वगुणाची स्तुती करणारा एक मीम पोस्ट करण्यात आलं होतं. त्यात BCCI निवडकर्ते आणि कोहली यांची टिंगल करण्यात आली होती. इतकंच नव्हे तर कोहलीला ‘केवळ कागदावरचा कर्णधार’ असं म्हणत हिणवण्यात आलं होतं. नेमकं ते ट्विट सूर्यकुमारने लाइक केलं.

काही वेळाने चूक लक्षात येताच त्याने ते ट्विट पुन्हा अनलाईक केलं. पण मधल्या काळात सूर्यकुमारने ट्विट लाइक केल्याचा फोटो तुफान व्हायरल झाला. सूर्यकुमारच्या अशा वागण्याने तो नेटिझन्सच्या टीकेचं लक्ष्य ठरला. एका युझरने तर सूर्यकुमारची लाज वाटत असल्याचंही म्हटलं.

दरम्यान, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी सूर्यकुमारला संधी मिळाली नसली तरी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मात्र सूर्यकुमारला दिलासा देत लवकरच तुला संधी मिळेल असा संदेश दिला आहे.