मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलचा तेरावा हंगाम गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या वन-डे आणि टी-२० संघात निवड झाली नाही. गेले काही हंगाम सातत्याने आश्वासक खेळी करुनही सूर्यकुमारच्या पदरी निराशा पडल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही चाहत्यांनी यासाठी विराट कोहली-रवी शास्त्री यांनाही जबाबदार धरलं. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसने चक्क सूर्यकुमारला न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर दिली. परंतू बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार यादव प्रकरणावर प्रतिक्रिया देत…सूर्यकुमार हा चांगला खेळाडू आहे परंतू भारतीय संघात येण्यासाठी त्याला थोडी वाट पहावी लागेल असं म्हणत त्याला धीर दिला.

हाच धागा पकडत पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने पाक क्रिकेट बोर्डाला फटकारलं आहे. पाकचा युवा क्रिकेटपटू वयाच्या २४ व्या वर्षी सामी अस्लमने निवृत्ती घेत अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ साली आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या सामी अस्लमने पाकिस्तानकडून १३ कसोटी आणि ४ टी-२० सामने खेळले आहेत. पाक क्रिकेट बोर्ड देशातल्या युवा खेळाडूंकडे योग्य लक्ष देत नसल्याचा आरोप कनेरियाने केला.

“समी अस्लम सातत्याने चांगला खेळ करत होता, पण त्याच्यावर अन्याय झाला. शान मसूद, इमाम उल-हक यांच्याप्रमाणे सामी अस्लमला कधीही संधी मिळाली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अशा वागणुकीमुळे खेळाडूंना देश सोडून इतर देशाकडून खेळावलं वाटणं ही दुर्दैवी गोष्ट आहे. भारताच्या सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर होती. परंतू त्याचा संघ, बीसीसीआय त्याच्यापाठीमागे ठाम उभा होता. त्यामुळे त्याला भारत सोडावा लागणार नाही.” कनेरिया आपल्या यु-ट्यूब चॅनलवर बोलत होता.