बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन रविवारी आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुशांत ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण सुशांतने ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्याने तो साऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला.

धोनीच्या खेळीपासून ते धोनीच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सवयीपर्यंत सुशांतने धोनीचा खूप चांगल्या पद्धतीने अभिनय केला. त्याच्या या अभिनयाची साऱ्यांनीच वाहवा केली. स्वत: धोनीनेदेखील त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता. मोठ्या पडद्यावर स्वत:लाच बघताना मला खूप मजा आली अशा शब्दात धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. धोनीकडे नेतृत्व असलेल्या CSK संघाच्या ट्विटर अकाऊंटवर सुशांतला श्रद्धांजली वाहिली. धोनीच्या मॅनेजरने धोनीच्या भावनाही एका वाहिनीला सांगितल्या.

CSK चा धडाकेबाज फलंदाज शेन वॉटसनदेखील सुशांतच्या मृत्यूची घटना ऐकून गहिवरला. सोमवारी त्याने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “सुशांतबद्दल विचार करणं मला थांबवताच येत नाहीये. ही घटना खूप दु:खदायक आहे. धोनीच्या चित्रपटाच त्याचा अभिनय पाहताना असा प्रश्न पडायचा की हा सुशांत आहे की स्वत: धोनीच आहे. धोनीची भूमिका सुशांतने अत्यंत चांगल्या पद्धतीने वठवली होती. त्याच्या जाण्याने साऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. सुशांत तू खूप लवकर निघून गेलास”, अशा शब्दात वॉटसनने आपल्या भावनांना वाट करून दिली.

सुशांतच्या आत्महत्येनंतर काय होत्या धोनीच्या भावना?

“सुशांतच्या मृत्यूच्या घटनेवर अजूनही विश्वास बसत नाही. शोक कसा व्यक्त करावा हेच मला कळत नाहीये. ही घटना खूपच नाट्यमय आहे. सुशांत केवळ ३४ वर्षांचा होता. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतात, पण त्याच्या पुढ्यात एक उज्ज्वल भविष्य होतं याची मला खात्री होती. सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून माही (धोनी) खूपच खिन्न झाला. त्याच्या मृत्यूचा खूपच धक्का बसला आहे”, अशी माहिती धोनीचे मॅनेजर अरूण पांडे यांनी एबीपी आनंद वाहिनीशी टेलिफोनवरून बोलताना दिली.

“शूटिंगदरम्यान मी सुशांतसोबत १८ महिने होतो. तो त्याच्या कामाप्रति समर्पित होता. जी भूमिका करायची होती, ती त्याने पूर्णपणे आत्मसात केली होती. धोनीची मैदानावरील छोटी-मोठी सवय हुबेहुब वठवण्यासाठी त्याने ९ महिने मैदानात सराव केला होता. तसेच धोनीसोबतही तो १५ दिवस राहिला होता. त्याने धोनीच्या भूमिका खूपच उत्तमरित्या पार पाडली होती. अभिनयासाठी सुशांत घेत असलेल्या मेहनतीवर धोनीसुद्धा खूप खुष होता”, असेही धोनी चित्रपटाचे निर्माते अरूण पांडे म्हणाले.