बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या घरात काम करणाऱ्या एका नोकराने पोलिसांना याबाबत माहिती दिल्याचे सांगितले गेले. सुशांत सिंग राजपूत हा ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर साऱ्यांनाच धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा आणि मनोरंजन विश्वातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. सुशांतने ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली. धोनीच्या खेळीपासून ते धोनीच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सवयीपर्यंत सुशांतने धोनीचा खूप चांगल्या पद्धतीने अभिनय केला. त्याच्या या अभिनयाची साऱ्यांनीच वाहवा केली. स्वत: धोनीनेदेखील त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता. मोठ्या पडद्यावर स्वत:लाच बघताना मला खूप मजा आली अशा शब्दात धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

सुशांतच्या आत्महत्येनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यानेही त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला. “एका अत्यंत मौल्यवान व्यक्तीला आपण साऱ्यांनी गमावलं हे ऐकून खूपच वाईट वाटलं. महेंद्रसिंग धोनी चित्रपटात त्याने केलेली भूमिका मी पाहिली होती. त्याने धोनीची भूमिका हुबेहुब वठवली होती. तो खूप परिश्रम करणारा तरूण होता. फार वाईट झालं”, असं ट्विट करत शोएब अख्तरने त्याला श्रद्धांजली वाहिली.

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा नवरा आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक यानेही सुशांतला आदरांजली वाहिली. “सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. जीवन हे खरं तर (क्रिकेटच्या एका) खूप चांगल्या डावासारखे आहे. ३४ हे काही जाण्याचे वय नाही. सुशांत, खूप लवकर गेलास. ईश्वर तुझ्या मृतात्म्यास शांती देवो”, असे ट्विट पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने केले.