आजपर्यंतच्या माझ्या यशाचे पूर्ण श्रेय मी माझ्या गुरूंना देतो. कारण, एखाद्या खेळाडूला घडवताना गुरूच जास्त मेहनत घेत असतात. माझे गुरू सत्यपाल यांनी खेळातील शिस्त आणि डावपेचांचे उत्तम धडे दिले. अनेकदा पदरी निराशा आली तेव्हा त्यांनीच मला त्यातून बाहेर काढले. त्यामुळे मी आज भारतासाठी अनेक पदके जिंकू शकलो. प्रत्येक खेळाडूने आपल्या गुरूंचा आदर करावा. त्याचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतील, असे प्रतिपादन ऑलिम्पियन कुस्तीपटू सुशीलकुमारने व्यक्त केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय महसूल सेवेच्या ६९ आणि ७० व्या तुकडीतर्फे आयोजित ‘इनटॅक्स २०१७’ वार्षकि क्रीडा महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून ते शुक्रवारी बोलत होते.

सुशीलकुमार म्हणाला की, ‘मी फार सर्वसामान्य घरातून आलो आहे. माझे वडील आजही एमटीएनएलमध्ये चालक आहेत. कुस्तीचे घराणे असल्याने साहजिकच माझीही आवड कुस्तीकडेच होती. लहानपणापासूनच सराव करताना पालकांनी आणि गुरूंनी माझ्यावर भरपूर मेहनत घेतल्यामुळेच मी आशियाई, ऑलिम्पिक, २०१० मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदकविजेता ठरलो.’

तो पुढे म्हणाला की, ‘गुरूंनी माझ्यासाठी कठोर मेहनत घेतल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, २००८ आणि २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मिळविलेले कांस्य आणि रौप्यपदक. तसेच २०१० मध्ये मला निवड चाचणीत अपयशही आले होते. तेव्हाही या गुरूंनीच मला नैराश्यातून बाहेर काढून अधिक मेहनत करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी एकापाठोपाठ एक पदके जिंकत गेलो. त्यामुळे कोणत्याही अपयशाला आपल्या मनावर स्वार होऊ न देता त्याचा सामना करा. विजय तुमचाच असेल. तसेच या क्रीडा महोत्सवातील सर्व खेळाडूंनी कोणत्याही खेळाशी जुळून रहायलाच हवे. खेळापासून तुम्ही खूप काही शिकू शकता. एकमेव खेळच असा आहे की, जो तुम्हाला यश मिळविण्यात मोलाची भूमिका बजावतो. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचा देशाची आíथक बाजू सांभाळण्यात व देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे.’

उत्तेजकांच्या आहारी जाऊ नका

जो खेळाडू उत्तेजकांच्या आहारी जातो तो माझ्या मते खेळाडूच नाही. उत्तेजक ही सध्या भारतीय क्रीडा वर्तुळातील मोठी समस्या आहे. मी शालेय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष आहे. त्या माध्यमातून उत्तेजक या विषयावर आम्ही जनजागृती करतो. अलीकडे कुस्तीला चांगले दिवस आले आहेत. ‘दंगल’ चित्रपटाचा चांगला प्रभाव पडलेला दिसतो. परिणामी, कुस्तीकडे मुलीही मोठय़ा प्रमाणात वळल्या आहेत. मुलींची वाढती संख्या पाहून त्यांच्यासाठी आम्ही वेगळ्या अकादमीची स्थापना केली आहे. पहिले ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून कुस्तीपटू मदानात यायचे. मात्र, आता पदक पटकाविण्यासाठी येत आहेत. देशातील सर्व राज्यात आता कुस्तीला पोषक वातावरण आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. नागपुरात हे प्रमाण कमी असले तरी ‘साई’सारखे केंद्र येताच येथेही चांगलीच ‘दंगल’ बघायला मिळेल, असे सुशीलकुमारने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.