जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताचा कुस्तीपटू सुशीलकुमार याने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आपली चमक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे कुस्तीपटू साक्षी मलिक हिनेही आपला सुवर्णपदक पटकावत महिला कुस्तीपटूंचे उत्तम प्रतिनिधित्व केले आहे. साक्षीबरोबरच अन्य महिला कुस्तीपटूंनीही धमाकेदार कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे. साक्षीने ६२ किलो वजनी गटात फ्रीस्टाईलमध्ये न्यूझिलंडच्या तायला तुआहिने फोर्ड हिचा १३-२ असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.

याशिवाय, भारतीय महिला कुस्तीपटूंनी स्पर्धेमध्ये नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार कांस्य पदके पटकावली आहेत. यामध्ये साक्षी मलिकसह इतर कुस्तीपटूंचा समावेश आहे. महिला कुस्तीपटूंनी एकूण १० वजनी गटात पदके पटकावली आहेत. तर सुशीलकुमारने ७४ किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाइलमध्ये न्यूझीलंडच्या आकाश खुल्लरला चीतपट करत सुवर्ण पदक पटकावले आहे. याच गटात भारताच्या प्रवीण राणाने कांस्य पदक पटकावले.

माझ्यासाठी हा गौरवाचा आणि भावूक करणारा क्षण आहे. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर ३ वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. मी हा विजय माझे माता-पिता, गुरू सतपाल, अध्यात्मिक योगगुरू स्वामी रामदेव आणि देशाच्या प्रत्येक नागरिकांना अर्पण करतो.’ असे ट्विटही सुशीलने आपल्या विजयानंतर केले. याबरोबरच महिला कुस्तीपटूंनी केलेली कामगिरी खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असल्याचे त्याने म्हटले.