News Flash

सुशीलच्या राष्ट्रीय निरीक्षकपदी नियुक्तीवर नरसिंगचा आक्षेप

सुशीलचे सासरे आणि प्रशिक्षक सतपाल सिंग यांचा छत्रसाल स्टेडियममध्ये आखाडा आहे.

| June 29, 2017 03:17 am

ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशाल कुमारची काही दिवसांपूर्वी क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय निरीक्षकपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीवर भारताचा निलंबित मल्ल नरसिंग यादवने आक्षेप घेतला असून, त्याची या पदावर नियुक्त केल्यास परस्पर हितसंबंधांचा फायदा त्याला होऊ शकतो, अशा आशयाचे पत्र नरसिंगने क्रीडा मंत्रालयाला लिहिले आहे.

सुशीलचे सासरे आणि प्रशिक्षक सतपाल सिंग यांचा छत्रसाल स्टेडियममध्ये आखाडा आहे. तिथे सुशील युवा कुस्तीपटूंना मार्गदर्शन करायला जातो. त्यामुळे सुशीलला जर राष्ट्रीय निरीक्षक केले तर त्याला परस्पर हितसंबंध जपता येतील, अशी भूमिका नरसिंगची आहे.

‘‘सुशीलच्या राष्ट्रीय निरीक्षकपदाला माझा आक्षेप आहे. कारण सुशील छत्रसाल स्टेडियमधील आखाडय़ामध्ये मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे तो जर राष्ट्रीय निरीक्षक झाला तर या आखाडय़ातील कुस्तीपटूंनाच तो जास्त संधी देईल आणि त्याचे हितसंबंध जपले जातील,’’ असे नरसिंगने क्रीडा मंत्रालयाला पत्रात लिहिल्याचे भारतीय कुस्ती महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. सुशीलने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये दोन पदकांची कमाई केली आहे. क्रीडा मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी १३ ऑलिम्पिकपटूंची राष्ट्रीय निरीक्षकपदी नियुक्ती केली होती.

रिओ ऑलिम्पिकच्या वेळी नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळला होता. त्या वेळी आपल्याला यामध्ये जाणीवपूर्वक गोवण्यात आले असल्याचे सांगत त्याने संशयाची सुई सुशीलकडे दाखवली होती. ‘‘आपल्या आहारामध्ये सुशीलच्या सांगण्यावरून उत्तेजक मिसळल्याचा आरोप नरसिंगने केला होता. त्या प्रकरणीही नरसिंगने या पत्रामध्ये आपली भूमिका विषद केली आहे,’’ असे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत सुशील कुमारला विचारले असता, तो म्हणाला की, ‘‘नरसिंगने काय लिहावे आणि काय नाही, याचे स्वातंत्र्य त्याला आहे. राष्ट्रीय निरीक्षक झाल्यावर मी कसे काय हितसंबंध जपू शकतो. देशात कुस्ती या खेळात काय घडामोडी सुरू आहे ते पाहून क्रीडा मंत्रालयाला कळवणे, हे निरीक्षकाचे काम असते. त्यानुसार ऑलिम्पिकसाठी फायदा होऊ शकतो.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 3:17 am

Web Title: sushil kumar narsingh yadav marathi articles
Next Stories
1 भारताच्या सामन्यांसाठी नवी मुंबईचा ‘पत्ता कट’?
2 प्रो-कबड्डीचा थरार २८ जुलैपासून, सलामीलाच मुंबई-पुण्याचे संघ भिडणार
3 मयंती लँगरच्या व्हिएतनाम ट्रिपचे खास फोटो
Just Now!
X