ऑलिम्पिकपदक विजेता भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार याची भारतीय कुस्ती महासंघाकडून पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय, सुशील कुमारसोबतच त्याचे प्रशिक्षक यशवीर सिंग आणि महिला कुस्तीपटू अल्का तोमर यांचाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशीही शिफारस करण्यात आली आहे.
सुशील कुमार याने देशासाठी दोन ऑलिम्पिक पदकांची कमाई केली आहे. २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशीलने कांस्यपदकाची, तर २०१२ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. रिओ ऑलिम्पिकसाठी सुशील कुमार पात्र ठरला नव्हता. दुखापतीमुळे त्याला ऑलिम्पिकची पात्रता फेरी पूर्ण करता आली नव्हती. सुशीलऐवजी नरसिंग यादवची रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झाली होती. पण नरसिंग यादव उत्तेजक प्रकरणात दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यामुळे रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला नरसिंगला देखील मुकावे लागले.
अल्का तोमर हिने चीनमध्ये २००६ साली झालेल्या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती, तर २०१० साली कॉमनवेल्थ स्पर्धेतील तोमरला सुवर्णपदक मिळाले होते. याआधी तोमरला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 4:19 pm