जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी होणाऱ्या भारतीय संघ निवड चाचणीत महाराष्ट्राच्या नरसिंग यादवला दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या सुशील कुमारच्या कसोटीस उतरावे लागणार आहे. ही चाचणी ६ व ७ जुलै रोजी होणार आहे.
जागतिक स्पर्धा ७ ते १२ सप्टेंबरदरम्यान अमेरिकेत लास व्हेगास येथे होईल. ही स्पर्धा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा आहे. सुशीलकुमारने २००८च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक, तर २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविले होते. सुशीलकुमारला ६६ किलोऐवजी ७४ किलोत भाग घ्यावा लागणार आहे. त्याने गतवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. नरसिंग हा ७४ किलो गटात भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. या वजनी गटात नरसिंग याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत.
जागतिक स्पर्धेतील प्रत्येक वजनी गटात पहिले सहा क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना ऑलिम्पिकचे तिकीट मिळत असल्यामुळे भारतीय खेळाडूंसाठी ही स्पर्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे.