निलंबित क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथची क्रिकेट ऑस्ट्रेलियावर कडाडून टीका

मेलबर्न : क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड व समिती सदस्य पॅट हॉवर्ड यांनी प्रत्येक सामन्यात विजयाच्या मिळवण्याच्या केलेल्या सक्तीमुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या सामन्यात चेंडूत फेरफार करण्यासारखा वाईट प्रकार घडला, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा निलंबित क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने बुधवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियावर ताशेरे ओढले.

मार्च महिन्यात केपटाऊन येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडूत फेरफार केल्यामुळे स्मिथसह उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना वर्षभरासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले, तर कॅमरून बँक्रॉफ्टला नऊ महिनांच्या शिक्षा ठोठावण्यात आली. या घटनेला आता नऊ महिने पूर्ण झाली असली तरी त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची प्रतिमा डागाळली गेली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीला उतरती कळा लागली.

माजी क्रिकेटपटू अ‍ॅडम गिलख्रिस्टला दिलेल्या मुलाखतीदरम्यान स्मिथ म्हणाला की, ‘‘नोव्हेंबर २०१६ मध्ये होबार्ट येथे आम्ही आफ्रिकेविरुद्ध सामना गमावला. तो आमचा सलग पाचवा पराभव होता. त्यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध आम्ही मालिका गमावली होती. आफ्रिकेविरुद्धच्या त्या पराभवानंतर सदरलँड व हॉवर्ड दोघेही थेट ड्रेसिंगरूममध्ये आले व म्हणाले, आम्ही तुम्हाला सामने जिंकण्यासाठी पैसे देतो, फक्त खेळण्यासाठी नाही.’’

‘‘कर्णधार म्हणून माझ्यासाठी हे फार निराशाजनक वक्तव्य होते. आम्ही खेळाडू मैदानावर सामने गमावण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी उतरतो. त्यासाठी आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावतो. मात्र सदरलँड व हॉवर्ड यांच्यासह झालेल्या त्या बैठकीनंतर संघातील खेळाडूंमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली,’’ असे स्मिथने सांगितले.

चेंडू फेरफार प्रकरणानंतर सदरलँड यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तर हॉवर्ड यांची गेल्या महिन्यात पदावरून हकालपट्टी करण्यात आली. ‘‘संघातील वातावरण व खेळाडूंच्या संस्कृतीविषयी तुम्ही बोलत

असाल, तर आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी आम्ही इंग्लंडला अ‍ॅशेस मालिकेत ४-० अशी धूळ चारली, त्या वेळेस कोणीच काही बोलले नाही. मात्र परिस्थिती बदलण्यास फार वेळ लागत नाही. त्यामुळे खेळाडू म्हणून तुम्हाला खडतर आव्हानांसाठी नेहमीच सज्ज असावे लागते,’’ असे स्मिथ म्हणाला. याव्यतिरिक्त, सध्या मी फक्त संघात पुनरागमन करण्यावर लक्षकेंद्रित करत असून त्यानंतर कर्णधारपदाबाबत विचार करेन, असेही स्मिथने सांगितले.