भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताच्या २० जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. या घटनेनंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झालं होतं. आयपीएल स्पर्धेला स्पॉन्सरशीप देणाऱ्या VIVO या कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी बीसीसीआयवरही सोशल मीडियातून दबाव वाढत होता. सुरुवातीला गव्हर्निंग काऊन्सिलने हा करार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतू सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये आणि इतर स्पॉन्सर्समध्ये नाराजी वाढल्यानंतर बीसीसीआयने VIVO सोबतचा करार वर्षभरासाठी स्तगित केला आहे. आयपीएल स्पर्धेच्या स्पॉन्सरशिपसाठी VIVO ने बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये दिले होते. प्रत्येक हंगामाला VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती.

अवश्य वाचा – VIVO कंपनीसोबतचा करार स्थगित, BCCI कडून अधिकृत घोषणा

VIVO सोबतचा करार स्थगित झाल्यानंतर तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयला नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. मात्र VIVO सोबतचा करार मोडल्यानंतर बीसीसीआयवर कोणत्याही स्वरुपाचं आर्थिक संकट आलेलं नसल्याची स्पष्टोक्ती अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली आहे. “बीसीसीआयवर कोणतंही आर्थिक संकट आलंय असं मी अजिबात म्हणणार नाही. VIVO सोबतचा करार स्थगित करणं हा परिस्थिती पाहून घेतलेला निर्णय आहे. बीसीसीआय प्रत्येकवेळी दुसरा पर्याय तयार ठेवतं. आतापर्यंत सर्व खेळाडू, राज्य संघटना आणि अधिकारी यांच्या सहकार्याने बीसीसीआयचं कामकाज हे चांगलं चाललेलं आहे. त्यामुळे एखाद्या वर्षी जरी काही अडचण आली तरीही त्याचा फारसा परिणाम होत नाही. प्रत्येक नावाजलेल्या ब्रँडकडे असा दुसरा पर्याय असतोच.” गांगुली एका खासगी कार्यक्रमात बोलत होता.

“गव्हर्निंग काऊन्सीलच्या बैठकीनंतर आम्ही आणि VIVO च्या अधिकाऱ्यांनी वेगळी चर्चा केली. या चर्चेअंती एक वर्षासाठी VIVO आयपीएलला स्पॉन्सर करणार नाही हे ठरवण्यात आलंय. दोन्ही बाजूंनी सामोपचाराने यावर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. या वर्षाच्या मोबदल्यात VIVO कंपनीसोबतचा करार २०२३ पर्यंत वाढवता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करणार आहे.” बीसीसीआय अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली होती. दरम्यान तेराव्या हंगामाच्या स्पॉन्सरशिपसाठी Jio, Amazon, Byju’s, Coca Cola यासारख्या कंपन्या शर्यतीत असल्याची माहिती मिळतेय.

अवश्य वाचा – VIVO चा करार स्थगित, IPL स्पॉन्सरशिपसाठी तीन कंपन्यात चुरस??