खेळात मी अव्वल दर्जाचे यश मिळवावे, असे माझ्या वडिलांचे स्वप्न आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत त्याचा एक टप्पा पूर्ण केला आहे. आता जागतिक स्पर्धेत

पदक मिळविण्याचे माझे ध्येय आहे, असे आशियाई मैदानी स्पर्धेतील हेप्टॅथलॉन विजेती स्वप्ना बर्मनने सांगितले.

स्वप्नाचे वडील पंचानन हे सायकलरिक्षा चालविण्याचा व्यवसाय करत होते. मात्र स्वप्ना लहान असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर ते गेली बरेच वर्षे अंथरुणाला खिळून आहेत.

पंचानन म्हणाले, ‘मी गेली अनेक वर्षे आजारामुळे सायकलरिक्षा चालवू शकत नाही. आमची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे आम्ही स्वप्नाला अपेक्षेइतका संतुलित आहार देऊ शकलो नाही. मात्र तिने अतिशय संघर्ष करीत अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकीर्द

घडवली आहे. तिने आशियाई विजेतेपद मिळवत आम्हा सर्वाना अभिमान वाटावा अशीच कामगिरी केली आहे.’

स्वप्नाची आई बसाना या पूर्वी चहाच्या मळ्यात रोजंदारीवर काम करीत करून संसाराचा गाडा हाकत आहेत. बसाना म्हणाल्या, ‘अभ्यास व खेळात स्वप्ना हुशार आहे. अर्थात तिने आता खेळातच कारकीर्द घडवावे अशी आमची इच्छा आहे.

तिला नोकरी मिळाली तर तिच्या खेळाच्या होणाऱ्या खर्चाला हातभार लागेल.’