भारताच्या स्वप्नील कुसळेने आशियाई नेमबाजी स्पर्धेतील कनिष्ठ पुरुष गटातील ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सुवर्णवेध घेतला. त्याने मिळविलेल्या या सुवर्णपदकासह भारताने मंगळवारी चार पदकांची कमाई केली.
स्वप्नीलने प्राथमिक फेरीत ११५१ गुण मिळवित चौथे स्थान घेतले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत त्याने अप्रतिम कौशल्य दाखवित ४५३.३ गुणांची नोंद करत सुवर्णपदक पटकावले. या गटात सेई वांग (चीन) व मोहम्मद करिमी (इराण) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. स्वप्नीलने अखिल शेरॉन व इशान गोयल यांच्या साथीत सांघिक विभागात रौप्यपदक मिळविले. त्यांनी ३ हजार ३९० गुणांची नोंद केली. चीनने ३ हजार ४५० गुणांसह सुवर्णपदक मिळविले. दक्षिण कोरियाने कांस्यपदक पटकाविले. त्यांना ३ हजार ३८३ गुण मिळाले.
कनिष्ठ गटातच भारताच्या शिवम शुक्ला, ऋषिराज बरोट व अर्जुन दास यांनी २५ मीटर रॅपीड फायर प्रकारात एक हजार ६४७ गुणांसह रौप्यपदक मिळविले. १६९८ गुणांसह दक्षिण कोरियाने सुवर्णपदक पटकावले. थायलंडने १६१६ गुणांसह कांस्यपदक मिळविले. वरिष्ठ गटात विजयकुमार, नीरजकुमार व अक्षय अष्टपुत्रे यांनी भारताला कांस्यपदक मिळवून दिले. त्यांनी १७१२ गुणांची नोंद केली. चीन व दक्षिण कोरिया यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळाले.