महाराष्ट्राची धावपटू स्वाती गाढवेने फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक अजिंक्यपद स्पध्रेच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी ३२ मिनिटे ५३.७३ सेकंदाची वेळ नोंदवून १०००० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक नावावर केले. ओएनजीसीच्या संजीवनी जाधवने (३४:४३.७६) रौप्यपदक, तर दिल्लीच्या मिनूने (३६:०२.२२) कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या मोनिका आथरेला (३७:०७.३१) चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

रिओ ऑलिम्पिकची याआधीच पात्रता मिळवणाऱ्या टिंटू लुकाने महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.  राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियाई विजेती लुकाने रेल्वेचे प्रतिनिधित्व करताना २ मिनिटे १.८४ सेकंदाची वेळ नोंदवून जेतेपद कायम राखले. तसेच तिने १८ वर्षांपूर्वीचा ज्योतीर्मोयी सिकदार (२ मिनिटे २.२८ सेकंद) यांचा स्पर्धा विक्रम मोडला. तामि़ळनाडूच्या गोमथी मरीमुथूने २:०६.४५ सेकंदासह रौप्य, तर पश्चिम बंगालच्या क्षिप्रा सरकाने २:०६.९५ सेकंदासह कांस्यपदक पटकावले.

अंतिम दिवशी एकाही खेळाडूला ऑलिम्पिक पात्रता मिळवता आलेली नाही.  तिहेरी उडीत राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या मयुखा जॉनीला दुखापत झाली. रिओ ऑलिम्पिक पात्रतेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरलेल्या मयुखाला पहिल्या प्रयत्नात ही दुखापत झाली. प्रशिक्षक ब्रेडोस ब्रेडोसियन यांनी सांगितले की,‘मयुखाला फ्रॅक्चर झालेले नाही, परंतु आम्ही वैद्यकीय  सल्ल्याची प्रतीक्षा पाहत आहोत.’

पहिल्याच दिवशी १०० मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद करणाऱ्या द्युती चंदला  २०० मीटरमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ओदिशच्या स्राबनी नंदाने २३.३९ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. द्युतीने (२३.४१) रौप्यपदक, तर ज्योथी एचएमने (२३.४२) कांस्यपदक निश्चित केले.