सुप्रिया दाबके, लोकसत्ता

मुंबई : करोना साथीमध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी यासारख्या खेळांना सुरुवात झाली आहे. मात्र जलतरणाला अजून परवानगी मिळालेली नाही. राज्यात मार्चपासून जलतरण केंद्रे बंद असल्याने खेळाडूंचे तर नुकसान झाले आहेच, पण प्रशिक्षक, जीवरक्षक या मंडळींवर बेरोजगारीची वेळ आली आहे.

मार्चमध्ये टाळेबंदी लागू झाल्यावर राज्यासह देशातील जलतरण केंद्रे एकाएकी बंद झाली. त्यानंतर टाळेबंदी-शिथिलकरणात काही दिलासाही देण्यात आला.  मात्र जलतरण केंद्रे सुरू करण्याच्या दृष्टीने कोणतीच हालचाल होत नाही. करोना साथीच्या काळात आरोग्यावर लक्ष द्या सांगण्यात येते. मात्र पोहणे हाच सर्वोत्तम व्यायाम आहे, याकडे अनुभवी जलतरण प्रशिक्षक राजेंद्र पालकर यांनी लक्ष वेधले.

‘‘करोना साथीच्या काळात वाफ घ्यायला सांगण्यात येते. नाक, घसा, फुफ्फुसे यांना करोना संसर्ग पोहोचत असल्याचे बोलले जाते. मात्र जलतरण म्हणजेच पोहण्याचा व्यायाम हा असा आहे की त्यामुळे फुफ्फुसे चांगली सक्रीय बनतात. तसेच श्वास घेण्याचाही व्यायाम पोहताना आपोआप होतो. पोहण्याचा व्यायाम करणारी मंडळी तुलनेने अधिक तंदुरुस्त असतात. पाठीचे दुखणे तसेच अनेक विकारांसाठीही पोहण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र हेच जलतरण बंद ठेवल्याने तंदुरुस्त माणसे पोहण्याअभावी आजारी पडत आहेत,’’ असे विश्लेषण पालकर यांनी केले.

सध्या खेळाडूंचे तर नुकसान होत आहेच. पण प्रशिक्षक, जीवरक्षक यांच्यासारख्या जलतरणावर अवलंबून असणाऱ्या अनेकांना आता रोजगारासाठी दुसरा पर्याय शोधावा लागत आहे. फक्त मुंबईतच दोनशेहून अधिक जलतरण प्रशिक्षक आहेत. त्यातच मुंबई महापालिकेच्या जलतरण तलावात मोठय़ा संख्येने हंगामी तत्वावर काम करणाऱ्या प्रशिक्षक, जीवरक्षक अडचणीत सापडले आहेत. ‘‘महापालिकेची जलतरण केंद्रेही बंद असल्याने हंगामी तत्वावर काम करणाऱ्यांचे पगार रखडले आहेत. खाजगी क्लबमधील जलतरण तलावात काम करणाऱ्या प्रशिक्षक मंडळींनाही सध्या कठीण काळ आहे. जोपर्यंत जलतरण केंद्रे सुरू होत नाहीत, तोपर्यंत या खेळाशी संबंधित प्रत्येकाला कठीण काळ आहे,’’ असे पालकर यांनी सांगितले.

खेळाडूंचे भवितव्य अधांतरी

ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेलाही जलतरण केंद्र राज्यात सुरू करावीत म्हणून आवाज उठवावा लागला. मात्र अद्याप त्याच्यासारख्या अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूच्या मागणीचीही दखलही घेण्यात आलेली नाही, याकडे जलतरण क्षेत्रातील मंडळी लक्ष वेधत आहेत. जलतरण हा ऑलिम्पिकमधील खेळ आहे. राज्यातही जलतरणाकडे कारकीर्द म्हणून बघणारे खेळाडू आहेत. मात्र करोना काळात जलतरण सुरू करण्याला सध्या केंद्र सरकारकडूनच परवानगी नाही त्यामुळे खेळाशी संबंधित मंडळींचे भवितव्य अधांतरी आहे, असे जलतरणातील तज्ज्ञ मंडळी म्हणत आहेत.