अपेक्षेप्रमाणे मुंबई संघाने कनिष्ठ राज्य जलतरण स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. त्यांनी आठही गटांत सांघिक विजेतेपद मिळवले. त्यांनी १,४६१ गुणांची कमाई केली.
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण असोसिएशनने शिवछत्रपती क्रीडानगरीत आयोजित केलेल्या या स्पर्धेत पुणे संघाने ७६१ गुणांसह सांघिक उपविजेतेपद पटकावले. १७ वर्षांखालील मुलांमध्ये मुंबईच्या ईशान जाफरने पाच सुवर्ण व चार राज्य विक्रम प्रस्थापित करीत वैयक्तिक नैपुण्यपद मिळविले. मुलींमध्ये मुंबईच्या आकांक्षा व्होराने पाच सुवर्ण व चार विक्रम नोंदवीत वैयक्तिक नैपुण्यपद पटकावले. १४ वर्षांखालील मुलांमध्ये नील रॉय (मुंबई)ने पाच सुवर्णपदकांची कमाई केली. मुलींमध्ये रायना सलढाणाने  पाच सुवर्ण व दोन राज्य विक्रम अशी कामगिरी केली.
मुंबईच्या वेदांत बाफनाने १२ वर्षांखालील गटात चार सुवर्णपदक, तर मुलींमध्ये मुंबईच्या केनिशा गुप्ताने चार सुवर्णपदक पटकावली. १० वर्षांखालील  मुलींमध्ये मुंबईच्या पलक धामीने चार सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदके मिळवले.
वॉटरपोलोत रायगड व मुंबई विजेते
रायगड संघाने पुण्याचा १०-३ असा पराभव करीत कनिष्ठ मुलांच्या गटात वॉटरपोलोमध्ये विजेतेपद मिळवले. मुलींमध्ये मुंबई संघाने बाजी मारली.