जगातील सर्वोच्च शिखर दोन वेळा यशस्वीरित्या पार केलेल्या स्वित्झर्लंडचा सुप्रसिद्ध गिर्यारोहक उली स्टेकचा माऊंट एव्हरेट चढताना अपघाती मृत्यू झाला. उली स्टेकने याआधी २०१२ आणि २०१५ साली यशस्वीरित्या ‘एव्हरेस्ट’ सर केला होता. तेही ऑक्सिजन पुरवठ्याविना त्याने ही कमाल केली होती. अतिशय सहजपणे पर्वत रांगा सर करणाऱ्या स्टेकला ‘स्विस मशीन’ या नावाने ओळखले जायचे. ४० वर्षीय स्टेक यावेळी एव्हरेस्ट शिखर तिसऱ्या नव्या मार्गाने सर करण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान ३२८० फूट उंचीवर असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. एका जगविख्यात गिर्यारोहकाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. स्टेकचा मृतदेह हेलिकॉप्टरच्या सहाय्याने काठमांडू येथे आणण्यात आला.

स्टेकच्या जाण्याने जगातील गिर्यारोहकांनी दु:ख व्यक्त केले आहे. जगातील सर्वच गिर्यारोहकांसाठी स्टेक एक प्रेरणास्थान होता. पर्वतरांगांच्या पलिकडच्या जगाची ओळख आम्हाला स्टेकने करून दिली होती, असे ब्रिटनच्या केंटन कूल या गिर्यारोहकाने सांगितले. स्टेकने गिर्यारोहणाच्या दरम्यान चित्रीत केलेले व्हिडिओ पाहून युवकांमध्ये गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली होती.