ऑल इंग्लंड स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारताचे सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत हे स्विस ओपन ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत चांगले यश मिळविण्यासाठी उत्सुक झाले आहेत. या स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.
सायनाने २०११ व २०१२ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. सायनाला पहिल्या फेरीत जर्मनीच्या कॅरीन श्वासे हिच्याशी खेळावे लागणार आहे. ऑल इंग्लंड स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला होता.
श्रीकांतने गतवर्षी येथे विजेतेपद पटकाविले होते. लागोपाठ दुसऱ्या विजेतेपदासाठी तो कसून प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे. त्याने यंदा लखनौ येथे झालेल्या सय्यद मोदी चषक ग्रां.प्रि. स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले होते. श्रीकांतला पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या महंमद बायू पांगिस्थू याच्याशी खेळावे लागणार आहे. भारताचा बी.साईप्रणीतने ऑल इंग्लंड स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा रौप्यपदक मिळविणाऱ्या ली चोंग वेई याच्यावर खळबळजनक मात केली होती. प्रणीतला येथे पहिल्या फेरीत लुकास कोर्वी या फ्रेंच खेळाडूशी खेळावे लागणार आहे. एच.एस.प्रणॉयला फिनलंडच्या कॅली कोलिजोनेन याच्याशी लढत द्यावी लागणार आहे. पी.व्ही.सिंधूची थायलंडच्या पोर्नतिप बुरानाप्रेसर्तक लढत होणार आहे.