स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला स्वित्झर्लंडच्या अग्रमानांकित कॅरोलिना मरिनच्या झंझावातापुढे निभाव लागला नाही. स्विस खुल्या सुपर ३०० स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मरिनकडून फक्त ३५ मिनिटांत पराभव पत्करल्याने सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

२०१९मध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेनंतर द्वितीय मानांकित सिंधूने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण मरिनने अंतिम सामन्यात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत २१-१२, २१-५ अशा फरकाने सिंधूला नमवले. दोन वर्षांनंतर प्रथमच मरिन-सिंधूची ही लढत झाली असून, मरिनने ९-५ अशी आघाडी घेतली आहे. सिंधूने सलग तिसऱ्या लढतीत मरिनविरुद्ध पराभव पत्करला.

पहिल्या गेममध्ये सिंधूने दिमाखदार सुरुवात करीत ६-४ अशी आघाडी घेतली, परंतु मरिनने तिला ६-६ असे बरोबरीत गाठून नंतर १२-८ असे मागे टाकले. मरिनने सिंधूहून अधिक वेगाने गुणांचा सपाटा लावत २१-१२ असा हा गेम खिशात घातला.

दुसऱ्या गेममध्ये मरिनने वर्चस्वपूर्ण प्रारंभ करताना सलग पाच गुण मिळवत ५-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूला पहिला गुण घेता आला. मग मरिनने २१-५ अशी सहज मजल मारत गेमसह सामनासुद्धा जिंकला.

सिंधूने या आठवडय़ातील उपांत्य लढतीपर्यंतच्या चारही सामन्यांत एकही गेम गमावला नाही. परंतु परंतु चालू वर्षीतील तिसरे जेतेपद पटकावरणाऱ्या सिंधूचा खेळ दडपणाखाली बहरलाच नाही.