जागतिक अजिंक्यपद विजेती पी. व्ही. सिंधू आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती सायना नेहवाल या दोन भारतीय खेळाडूंमध्ये मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचा उपांत्य सामना रंगण्याची शक्यता आहे.

टोक्यो ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची असून महिला एकेरीत सिंधू आणि सायना यांच्यावर भारताची भिस्त आहे. सिंधूची पहिल्या फेरीत तुर्कीच्या नेसलिहान यिग्टशी गाठ पडणार आहे. सायनापुढे सलामीला कोरियाच्या संग जी ह्य़ुनचे आव्हान असेल. सिंधू आणि सायना या दोघींनीही अपेक्षेनुसार कामगिरी केली, तर उपांत्य फेरीत त्या एकमेकांविरुद्ध खेळताना दिसू शकतात. सिंधूने ऑलिम्पिक पात्रता मिळवली असली तरी सायनासाठी मात्र ही स्पर्धा महत्त्वाची आहे.

पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा पहिल्याच फेरीत आमनेसामने येणार आहेत. याबरोबरच एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन, अजय जयराम, बी. साईप्रणित हे खेळाडूसुद्धा या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुरुष दुहेरीत सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीवर आशा आहेत. त्याशिवाय महिला आणि मिश्र दुहेरीत भारताच्या प्रत्येकी तीन जोडय़ा खेळणार आहेत.