लखनऊ : सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून येथे प्रारंभ होत असून, सायना नेहवाल कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर लक्ष्य सेन ‘बीडब्ल्यूएफ’ वर्ल्ड टूर दर्जाचे तिसरे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहे.

तीन वेळा विजेतेपद पटकावणारी सायना आजारपण आणि दुखापतींच्या आव्हानांशी सामना करीत आहे. त्यामुळे तिची कामगिरी या वर्षांत कमालीची खालावली आहे. यंदाच्या हंगामात सहा स्पर्धामध्ये तिचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे. त्यामुळे वर्षांचा शेवट जेतेपदाने करण्याचे ध्येय तिने जोपासले आहे. २९ वर्षीय सायनाने पुढील वर्षी कामगिरीत सुधारणा करण्याच्या इष्रेने प्रीमियर लीग बॅडमिंटन स्पर्धेतून नुकतीच माघार घेतली आहे.

विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुग्धा आग्रे महिला एकेरीत सलामीच्या सामन्यात बेल्जियमच्या लिआने टॅनचा सामना करणार आहे. पुरुष एकेरीत २०१६चा विजेता किदम्बी श्रीकांत, गतविजेता समीर वर्मा आणि जागतिक कांस्यपदक विजेता बी. साईप्रणित यांच्यावर भारताच्या आव्हानाची धुरा असेल.