दोन वेळा विजेती सायना नेहवाल आणि गतविजेत्या परुपल्ली कश्यपने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पध्रेतील आपल्या अभियानाला सकारात्मक सुरुवात करताना उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे.
बाबू बनारसी दास बंदिस्त स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पध्रेत लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायनाने दुसऱ्या फेरीत प्रवेश करताना स्वीडनच्या मटिल्डा पीटरसनचा फक्त २८ मिनिटांत २१-७, २१-९ असा पराभव केला. आता तिची गाठ रशियाच्या नतालिया पेर्मिनोव्हाशी पडणार आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या कश्यपने पहिल्या अनुप श्रीधरचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मलेशियाच्या यी हॅन चाँगला २१-१०, २१-१२ असे पराभूत केले. आता तिसऱ्या फेरीत त्याचा सामना १२व्या मानांकित मलेशियाच्या झुल्फादली झुल्किफ्लीशी पडणार आहे.
पुरुष एकेरीत द्वितीय मानांकित अजय जयरामने विनय कुमार रेड्डीला २१-१२, २१-१२ असे पराभूत केले, तर मलेशियाच्या टेक झि सूचा २७-२५, २१-१५ असा पराभव केला. तृतीय मानांकित गुरूसाईदत्तने आधी व्हीलावन वासुदेवनचा २१-१०, २१-१० असा पराभव केला आणि विपुल सैनीला २१-११, २१-११ असे पराभूत केले.