लखनौ : भारताच्या सौरभ वर्मा आणि रितूपर्णा दास यांनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची शुक्रवारी उपांत्य फेरी गाठली आहे. किदम्बी श्रीकांतचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.

हैदराबाद आणि व्हिएतनाम येथील दोन ‘बीडब्ल्यूएफ सुपर १००’ दर्जाच्या स्पर्धा जिंकणाऱ्या सौरभने थायलंडच्या तीन वेळा कनिष्ठ विश्वविजेत्या कुणलावत वितिदसर्नला नामोहरम केले. २६ वर्षीय सौरभची उपांत्य फेरीत कोरियाच्या हीओ क्वांग ही याच्याशी गाठ पडणार आहे.

तिसऱ्या मानांकित श्रीकांतची वाटचाल सन व्ॉन हू याने रोखली. इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या श्रीकांतला सातव्या मानांकित सन व्ॉनकडून १८-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला.

महिला एकेरीत माजी राष्ट्रीय विजेत्या रितूपर्णाने श्रुती मुंदडाचा २४-२६, २१-१०, २१-१९ असा पराभव केला. रितूपर्णाची शनिवारी अंतिम फेरीत थायलंडच्या फिटायापोर्न चायवानशी गाठ पडणार आहे.

महिला दुहेरीत कुहू गर्ग आणि अनुष्का पारेख जोडीने हाँगकाँगच्या एनजी विंग यंग आणि युऊंग टिंग जोडीकडून १५-२१, ९-२१ अशी हार पत्करली. सिम्रन सिंशी आणि रितिका ठाकर जोडीनेही जर्मनीच्या लिंडा ईफलर आणि इसाबेल हेर्टरिच जोडीकडून ७-२१, १६-२१ असा पराभव पत्करला.