मुंबईच्या श्रेयस अय्यरने सय्यद मुश्‍ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेत दुसरे शतक ठोकले. मध्य प्रदेशविरोधातील सामन्यात मुंबईने ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात श्रेयसने नाबाद १०३ धावा केल्या. या आधी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याने सिक्कीमविरुद्ध १४७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात श्रेयसचे शतक आणि तुषार देशपांडेची प्रभावी गोलंदाजी याच्या बळावर मुंबईने सलग तिसऱ्या लढतीत एकतर्फी विजय मिळवला.

मध्य प्रदेशने दिलेल्या १४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ आणि अजिंक्‍य रहाणे या दोघांनाही सूर गवसला नाही. पृथ्वी शॉ पहिल्याच चेंडूवर आणि पाठोपाठ रहाणेही तंबूत परतला. त्यामुळे मुंबईची अवस्था २ बाद ७ होती. पण त्यानंतर श्रेयस आणि सूर्यकुमार यादवने सलग तिसऱ्या लढतीत शतकी भागीदारी केली आणि मुंबईला विजय मिळवून दिला. अय्यरने या स्पर्धेत आतापर्यंत 296 धावा केल्या आहेत. त्याने मध्य प्रदेशविरुद्ध केलेल्या श्रेयसने १०३ धावांच्या खेळीत ८० धावा या केवळ चौकार-षटकारांच्या मदतीने केल्या.

त्याआधी तुषार देशपांडेच्या भेदक माऱ्यापुढे मध्यप्रदेशची फलंदाजी हतबल ठरली. रजत पाटीदारने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्यासह व्यकंटेश अय्यरने २९ धावा केल्या. पण सहकाऱ्यांची साथ न लाभल्याने त्यांना केवळ १४३ धावाच करता आल्या. तुषारने २८ धावांत ४ बळी टिपले, तर धवल कुलकर्णी आणि शार्दूल ठाकूरने २-२ बळी घेतले.