Syed Mushtaq Ali Trophy 2021: सय्यद मुश्ताक अली टी20 चषकातील उपांत्य सामन्यात केदार देवधरच्या नेतृत्वातील बडोद्याच्या संघानं अंतिम फेरीत धडक मारली. फायनलमध्ये बडोद्याचा सामना दिनेश कार्तिकच्या तामिळनाडू संघासोबत रविवारी, ३१ जानेवारी रोजी होणार आहे. पंजाबविरोधात झालेल्या सामन्यात केदार देवधरनं कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत तुफानी अर्धशतक झळकावलं. केदारला कार्तिक काकडेनं साथ देत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.

केदार देवधर आणि कार्तिक काकाडे यांच्या तुफानी फटकेबाजीच्य बळावर बडोद्यानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा केल्या. प्रत्त्युत्तर पंजाब संघाला ८ गड्यांच्या मोबदल्यात १३५ धावांपर्यंतच मजल मारता आली. बडोद्यानं २५ धावांनी सामना जिंकत मुश्ताक अली चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली.

आणखी वाचा- कार्तिकचं तुफानी अर्धशतक, तामिळनाडू लागोपाठ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत

केदार देवधरनं ४९ चेंडूत ४ चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीनं ६४ धावांची खेळी केली. तर कार्तिकनं ४१ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी केली. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर बडोद्यानं २० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा केल्या. पंजाबकडून संदीप शर्मा, कौल आणि मार्कंड्ये यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

१६१ धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला १३५ धावांपर्यंत मजल मारता आली. बडोद्याच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करत धावा रोखल्या. पंजाब संघानं नियमीत अंतरावर आपले फलंदाज गमावले. पंजाबसाठी मनदीप सिंहनं ४२ धावांची खेळी केली.