मुंबई : फलंदाजांच्या अपयशामुळे बलाढय़ मुंबईला मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पुद्दुचेरीने सहा गडी राखून विजय मिळवल्यामुळे मुंबईची एलिट ई-गटात तळाच्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पुद्दुचेरीने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र सांतामूर्ती आणि ए. अरविंदराज यांच्या गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज पुरते निष्प्रभ ठरले. त्यामुळे मुंबईचा डाव १९ षटकांत अवघ्या ९४ धावांवर गडगडला. एस. कार्तिक (२८) आणि शेल्डन जॅक्सन (२४) यांच्या उपयुक्त योगदानामुळे पुद्दुचेरीने चार गडी गमावून सहजपणे विजय साकारला.

आदित्य तरे (३), कर्णधार सूर्यकुमार यादव (८), सिद्धेश लाड (२), सर्फराझ खान (०) या मुंबईच्या अव्वल फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. शिवम दुबे (२८) आणि आकाश पारकर (नाबाद २०) यांनी काही अंशी प्रतिकार केल्याने मुंबईला ९४ धावांपर्यंत मजल मारता आली. पुद्दुचेरीकडून सांतामूर्तीने पाच तर अरविंदराज याने दोन बळी मिळवले.

मुंबईचे आव्हान पार करताना कार्तिक आणि सलामीवीर दामोदरन रोहित यांनी ४५ धावांची भागीदारी रचत पुद्दुचेरीला आश्वासक सुरुवात करून दिली. पण शिवम दुबेने या दोघांचाही अडसर दूर केल्यानंतर जॅक्सनने नाबाद २४ धावा फटकावत पुद्दुचेरीच्या विजयावर मोहोर उमटवली.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : १९ षटकांत सर्व बाद ९४ (शिवम दुबे २८, आकाश पारकर नाबाद २०; सांतामूर्ती ५/२०) पराभूत वि. पुद्दुचेरी : १९ षटकांत ४ बाद ९५ (एस. कार्तिक २६, शेल्डन जॅक्सन नाबाद २४; शिवम दुबे २/८).