राष्ट्रकुल स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरीचे स्वप्न बाळगून गोल्ड कोस्ट येथे दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंना स्पर्धेपूर्वीच चौकशीला सामोरे जावे लागले. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या निवासस्थाना शेजारी इंजेक्शन (सीरिंज) सापडल्याने त्यांच्याभोवती चौकशीचा ससेमिरा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा ग्रामातील सफाई कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांना इंजेक्शनची माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धा महासंघाचे प्रमुख कार्यकारी डेव्हिड ग्रेव्हम्बर्ग यांनी चौकशीचे आदेश दिले. मात्र भारतीय संघाने आपण कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे सांगितले.

‘‘राष्ट्रकुल स्पर्धेत उत्तेजकाच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. खेळाडूंच्या निवासस्थानी इंजेक्शन असल्याच्या सफाई कर्मचाऱ्याच्या माहितीनंतर महासंघाचे वैद्यकीय आयुक्त त्वरित तेथे दाखल झाले. जर त्यांना या प्रकरणात तथ्य आढळले, तर खेळाडूंना गंभीर कारवाईला सामोरे जावे लागेल. वैद्यकीय आयुक्त या प्रकरणाचा अहवाल उत्तेजक विरोधी समितीकडे सुपूर्द करेल,’’ असे ग्रेव्हम्बर्ग यांनी सांगितले. मात्र त्यांनी खेळाडूंची नावे जाहीर करण्यास नकार दिला.

दरम्यान, भारतीय संघाचे व्यवस्थापक अजय नारंग यांनी या आरोपांचे खंडन केले. ती इंजेक्शन क्रीडा ग्रामातील रस्त्याशेजारी एका बाटलीत असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘एका व्यक्तीने आम्हाला या संदर्भातली माहिती दिली आणि एक सुजाण नागरिक म्हणून मी त्वरित वैद्यकीय आयुक्तांना बोलावून घेतले. ती बाटली आम्ही उघडली देखील नाही.’’