भारताविरुद्धची टी २० मालिका श्रीलंकेनं २-१ ने जिंकली. भारताने या सामन्यात ८१ धावा करत श्रीलंकेसमोर ८२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय संघाची टी २० सामन्यातील सर्वात निराशाजनक कामगिरी क्रीडाप्रेमींनी अनुभवली. पहिल्या १० षटकात सर्वात कमी धावसंख्येची नोंद झाली आहे. भारताने १० षटकात ५ गडी गमवून ३९ धावा केल्या. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची कामगिरी निराशाजनक झाली. भारताचा कर्णधार शिखर धवन महत्त्वाच्या सामन्यात भोपळाही फोडू शकला नाही. पहिल्याच षटकात चमीराच्या गोलंदाजीवर धनंजया डि सिल्वा हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर संघाच्या २३ धावा असताना देवदत्त पडिक्कल बाद झाला. संघाच्या २४ धावा असताना संजू सॅमसन बाद झाला. संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याच्या वैयक्तिक १४ धावा असताना हसरंगाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. नितीश राणाही भारता डाव सावरू शकला नाही. दासून शनाकाने त्याच्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला.

भारताचा टी २० सामन्यातील निचांकी धावसंख्या

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२००८) मेलबर्न, ७४ धावांवर सर्वबाद
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (२०१६) नागपूर, ७९ धावांवर सर्वबाद
  • भारत विरुद्ध श्रीलंका (२०२१) कोलंबो, ८ गडी बाद ८१ धावा
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०१५) कटक, ९२ धावांवर सर्वबाद
  • भारत विरुद्ध श्रीलंका (२०१६) पुणे, १०१ धावांवर सर्वबाद

तिसऱ्या निर्णायक सामन्यात हसरंगाने दमदार कामगिरी केली. या अटीतटीच्या सामन्यात हसरंगाने आपल्या भेदक गोलदांजीचं प्रदर्शन केलं. विशेष म्हणजे आज हसरंगाचा वाढदिवस असल्याने ही कामगिरी त्याच्या स्मरणात राहणार आहे. त्याने भारताचे चार गडी बाद करत भारताला ८१ या धावसंख्येवर रोखलं. त्याने चार षटकात केवळ ९ धावा दिल्या आणि महत्त्वाचे ४ खेळाडू बाद केले. हसरंगाने ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार आणि वरूण चक्रवर्थीला तंबूचा रस्ता दाखवला. .

दोन्ही संघातील खेळाडू

भारत- ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, देवदत्त पडिक्कल, संजु सॅमसन, नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, संदीप वॉरिअर, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्थी

श्रीलंका- अविक्सा फर्नांडो, पथुम निसंका, मिनोद भानुका, सदीरा समरविक्रमा, दासुन शनाका, धनंजया डि सिल्वा, वानिन्दु हसरंगा, रमेश मेंडिस, चमिका करुनारत्ने, अकिला धनंजया, धुशमंथा चमीरा