फ्लॅट विकेट, स्विंग नाही, स्पिन नाही असा पोषक कमी दाबाचा पट्टा वानखेडेवर तयार झाला आणि मग आले गेल नावाचे सुसाट चक्रीवादळ. त्यात वाहून गेले गोलंदाज, ऊन्मळून पडला क्षेत्ररक्षकांचा आत्मविश्वास आणि भुर्र् उडून गेला इंग्लंडचा संघ. नशीबाने प्रेक्षकांनी त्यांच्याकडे आलेले चेंडू झेलायचे प्रयत्न केले नाहीत. नाहीतर या चक्रीवादळाने जीवितहानी होण्याचा देखील पुरेपूर धोका होता.
गेलसारखे स्फोटक फलंदाज धोकादायक तेव्हा होतात जेव्हा ते बॅटबरोबर डोकं चालवतात. गोलंदाज आपल्याला दाणपट्टा फिरवण्याची संधी कधी तरी देणार आहे, त्यामुळे चांगल्या चेंडूवर जोखीम घ्यायची नाही. या दॄष्टिकोनाने खेळणारा स्फोटक फलंदाज विरुद्ध संघाच्या कप्तानाची झोप उडवतो. गेलला स्वतःच्या क्षमतेवर जबरदस्त विश्वास आहे. संधी मिळाल्यावर मी षटकार खेचणारच. या तुडूंब आत्मविश्वासावर तो फलंदाजी करतो. त्यामुळे काल त्याने चांगले यॉर्कर्स सन्मानाने खणून काढले आणि लेंथ चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडू भिरकावले. ते पण कसे? जागेवरून. फार हालचालीचे कष्ट नाहीत. (जी हालचाल करायची ती सामना संपल्यावर गंगनम आणि केलिप्सो नृत्य करण्या करताच). काय अफाट टाइमिंग आणि ताकद. जवळजवळ प्रत्येक षटकार शंभर मीटरच्या आसपास जाऊन पडला. गेल, गेल, गेला. अर्थात गोईंग, गोईंग, गॉन असे उत्तुंग षटकार. प्रतिस्पर्ध्याला स्पर्धेतून उठवण्याची इनिंग होती ही. इंग्लंडला बराच वेळ लागेल यातून सावरायला. गेलला थांबवायचे असेल तर विकेट कडून मदत मिळणे अनिवार्य आहे. फ्लॅट विकेटवर कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर गोलंदाज गेलला आउट करू शकेल, असे वाटत नाही.
पाकिस्तानने बांगलादेशला हरवताना कधी नव्हे ती फलंदाजी चांगली केली. फलंदाजानी मोठा स्कोअर लावल्यावर पाकिस्तानची गोलंदाजी अजिंक्य वाटते.
भारत न्यूझीलंडकडून हारला. टर्निंग ट्रॅक वर खेळणे कुणालाही अवघडच. मंद खेळपट्टी आणि मंद व स्पिन घेणारी खेळपट्टी यापैकी कोणती खेळपट्टी आपल्याला योग्य याची कल्पना भारतीय संघ व्यवस्थापनाला आली असेल. असो.
आता वाट बघायची सर्व लढतींच्या लढतीची. भारत पाकिस्तान. १९ मार्च ईडन गार्डन्स. बेस्ट ऑफ लक इंडिया. यू कॅन डू ईट!!!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com