चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ५ गड्यांच्या मोबदल्यात २७४ धावा केल्या. मार्नस लाबूशेनचे शानदार शतक आणि मॅथ्यू वेडची ४५ धावांची खेळी याच्या जोरावर यजमान संघाला पहिल्या दिवशी अडीचशेपार मजल मारता आली. भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. टी नटराजनने २ बळी टिपले. तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी टिपला. दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी स्थान मिळालेल्या नटराजनने कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच दिवशी दिग्गज वेगवान गोलंदाज जहीर खान याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

नटराजनने आपल्या पहिल्या दिवसाच्या खेळात आधी मॅथ्यू वेड आणि नंतर मार्नस लाबूशेन या दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. वेड ४५ धावांवर तर लाबूशेन १०८ धावांवर माघारी परतले. वन डे, टी२० आणि कसोटी अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गडी मिळवणारा नटराजन हा केवळ दुसरा भारतीय डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला. या आधी जहीर खानने हा पराक्रम करून दाखवला होता. नटराजनने आपल्या वन डे पदार्पणात दोन बळी टिपले. तर टी२० पदार्पणाच्या सामन्यात तीन गडी बाद केले.

आणखी वाचा- IND vs AUS: नटराजनची पहिल्याच कसोटीत भुवनेश्वर कुमारच्या विक्रमाशी बरोबरी

दरम्यान, पहिल्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर एका धावेवर तर मार्कस हॅरिस ५ धावांवर माघारी परतला. स्मिथदेखील ३६ धावांवर बाद झाला. मॅथ्यू वेड आणि लाबूशेन यांच्यात शतकी भागीदारी झाली, पण वेडला अर्धशतक (४५) करता आले नाही. मार्नस लाबूशेनने मात्र ९ चौकारांसह दमदार शतक झळकावलं. तो १०८ धावांवर झेलबाद झाल्यानंतर कर्णधार टीम पेन (२८) आणि कॅमेरॉन ग्रीन (३८) या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत चांगला खेळ केला.