क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आशावाद; ११ ते २१ मार्चदरम्यान रंगणार स्पर्धा

मुंबईतील अनेक गुणवंत खेळाडूंना केवळ भारतीय संघात जागा उपलब्ध नसल्यामुळे संधी मिळाली नाही. तसेच अनेक गुणी खेळाडूंना मुंबईच्या रणजी संघात जागा उपलब्ध नसल्याने संधी मिळत नाही. मात्र आगामी मुंबई ट्वेन्टी-२० लीग ही त्या युवा खेळाडूंसाठी व्यासपीठ ठरेल, असा आशावाद भारतरत्न सचिन तेंडुलकरने व्यक्त केला. ११ ते २१ मार्च या कालावधीत वानखेडे स्टेडियमवर ही लीग खेळवण्यात येणार आहे.

मुंबई ट्वेन्टी-२० लीगचा सदिच्छादूत असलेला सचिन म्हणाला, ‘‘मुंबई क्रिकेटला अशा लीगची आवश्यकता होती, हे मला मनापासून वाटत होते. मुंबई क्रिकेटने नेहमीच भारतीय क्रिकेटचे प्रतिनिधित्व केले आणि त्याबाबतचे आकडेच हा सक्षम पुरावा आहे. या लीगचा एक भाग असल्याचा मला आनंद आहे. या लीगमध्ये युवा खेळाडूंना मुंबईच्या काही अनुभवी खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळेल. त्यातून त्यांना बरेच काही शिकायला मिळेल आणि या लीगकडून मला हेच अपेक्षित आहे.’’

मुंबई ट्वेन्टी-२० लीगबाबत सांगायचे तर मराठीतून बोलायला हवे. ही आपली लीग आहे, सचिनच्या या बोलण्यातून तो या लीगसाठी किती उत्सुक आहे, हे स्पष्टपणे दिसत होते. या वेळी त्याने मुंबई क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासालाही उजाळा दिला. तो म्हणाला, ‘‘मुंबईने सर्वाधिक ४१ वेळा रणजी करंडक उंचावला आहे. माझ्या क्रिकेट प्रवासाला शिवाजी पार्क येथून सुरुवात झाली. त्यानंतर मरिन ड्राइव्ह येथील जिमखाना आणि मग आंतरराष्ट्रीय प्रवास असा सुरू झाला. पद्माकर शिवलकर सर मला गोलंदाजी करायचे. त्या वेळी ते माझ्या वयापेक्षा तिप्पट मोठे होते. १३व्या वर्षी झालेला सावंतवाडी दौरा, असे अनेक किस्से मुंबई क्रिकेटच्या बाबतीत सांगण्यासारखे आहेत.’’

मुंबई क्रिकेटने भारताला सचिनसह अजित वाडेकर, सुनील गावस्कर, चंद्रकांत पंडित, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, प्रवीण अमरे, अजित आगरकर, विनोद कांबळी, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूर असे अनेक खेळाडू दिले. या लीगचे महत्त्व सांगताना सचिन म्हणाला, ‘‘या लीगमुळे खेळाडूचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे. त्यांना कुटुंबाचा आर्थिक कणा बनता येणार आहे आणि ही गोष्ट खेळाडूंसाठी सर्वात महत्त्वाची आहे.’’