मुंबईत टी२० मुंबई लीग क्रिकेट स्पर्धेचे नुकतेच मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला सुनील गावसकरांसह भारतीय क्रिकेट जगतातील अनेक खेळाडूंनी उपस्थिती लावली होती. मीडिया रिपोर्टनुसार या सोहळ्यात सुनील गावसकर यांचे नाव पहिले न घेतल्यामुळे त्यांना राग आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनाली बेंद्रे आणि श्रेयस तळपदे करत होते. सोनालीने सुनील गावसकर यांच्याआधी सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकर यांचे नाव घेतले. आपल्याआधी या दोन खेळाडुंचे नाव घेणे गावसकरांना रुचले नाही. तेंडुलकर आणि वेंगसरकर यांच्यापेक्षा आपण वरिष्ठ असूनही आपले नाव शेवटी घेतल्याचे गावस्करांना आवडले नाही असे म्हटले जात आहे. सुनील गावसकर मुंबई टी२० लीगचे आयुक्त आहेत.

‘क्रिकट्रॅकर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सुनील गावस्कर यांनी सोनालीला याचा जाबही विचारला. गावस्करांनी सोनालीला प्रश्न विचारला की, जर ती त्यांना सलामीचा फलंदाज म्हणते तर त्यांचं नाव तिसरं कसं काय घेतलं?

सुरूवातीला सोनाली आणि श्रेयस यांना गावस्कर मस्करी करत आहेत असे वाटले त्यामुळे त्यांच्या या प्रश्नावर दोघंही हसले. पण गावस्कर मात्र मस्करीच्या मूडमध्ये नव्हते. त्या दोघांच्या हसण्यावर त्यांनी ते का हसत आहेत असा प्रतिप्रश्न केला. गावस्कर श्रेयसला म्हणाले की, ‘तू तर क्रिकेटवर आधारित एका सिनेमात कामही केले आहेस. तर तू असं कसं करु शकतोस?’ परिस्थिती फारच गंभीर होत चालल्याचं लक्षात येता सोनालीने गावस्करांची ‘माफ करा’ अशी मराठीत माफी मागितली.

गावस्करांनी नंतर वातावरण थंड करण्यासाठी सोनाली आणि श्रेयसला ते मस्करी करत असल्याचे सांगितले. पण त्यांचे आधीचे बोलणे ऐकून ते मस्करी करत होते असे तिथे उपस्थित कोणालाच वाटलं नाही. यानंतर गावस्करांनी त्यांचे भाषण दिले आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला होता. टी२० मुंबई लीगमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू दिसतील. क्रिकेट प्रेमींसाठी टी२० मुंबई लीग स्पर्धा पर्वणीच असेल यात काही शंका नाही.