कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने लौकिकाला साजेसा खेळ करत न्यूझीलंडला नेदरलँड्सवर सहा विकेट्सनी सहज विजय मिळवून दिला. अखेरच्या सहा षटकांत ५६ धावांची आवश्यकता असताना मॅक्क्युलमने चौकार, षटकारांची आतषबाजी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.
पीटर बोरेन (४९) आणि टॉम कूपर (नाबाद ४०) यांच्या सुरेख योगदानामुळे नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १५१ धावा उभारल्या होत्या. हे आव्हान पार करताना  मॅक्क्युलमने एक बाजू लावून धरत न्यूझीलंडला विजयासमीप आणून ठेवले. त्याने कोरे अँडरसनसह पाचव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी रचली. १७व्या षटकात मॅक्क्युलम बाद झाला तेव्हा न्यूझीलंडला विजयासाठी १९ चेंडूंत फक्त १८ धावांची आवश्यकता होती. चार चौकार आणि तीन षटकारांसह ६५ धावांची खेळी साकारणाऱ्या मॅक्क्युलमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.