दक्षिण आफ्रिकेत २००७ मध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाने क्रिकेटमधील एका रोमहर्षक पर्वाला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंतच्या नऊ वर्षांत ट्वेन्टी-२० क्रिकेटने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. भारताच्या यजमानपदाखाली प्रथमच होणाऱ्या यंदाच्या विश्वचषकात आठ मुख्य संघ आणि पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडून आठपैकी दोन संघ असे एकंदर दहा संघ दुसऱ्या फेरीत झुंजणार आहेत. ‘अ’ गटात श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांचा समावेश असून, त्या तुलनेत ‘ब’ गटात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. ३ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या महासंग्रामाच्या निमित्ताने महत्त्वाच्या आठ संघांचा घेतलेला आढावा-

गट पहिला

श्रीलंका (८)

विजेते : २०१४ ’ उपविजेते : २००९, २०१२

गतविजेत्या श्रीलंकेच्या गेल्या काही महिन्यांतील कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव दिसून येत आहे. मात्र ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आतापर्यंतचा लेखाजोखा पाहिल्यास सर्वाधिक विजय आणि सातत्य या संघात दिसून आले आहे. एक विजेतेपद आणि दोनदा उपविजेतेपदे त्यांच्या खात्यावर जमा आहेत. भारताविरुद्ध झालेली तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका गमावल्यानंतर आशिया चषकात श्रीलंकेला फक्त संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध विजय मिळवता आला होता. कुमार संगकारा, महेला जयवर्धने यांच्यासारखे दिग्गज क्रिकेटपटू निवृत्त झाल्यामुळे हा संघ संक्रमणातून जात आहे.

दक्षिण आफ्रिका (३)

दक्षिण आफ्रिकेची सध्याची वाटचाल त्यांच्यासाठी अतिशय अनुकूल असली तरी प्रत्यक्षात हा संघ कितपत मजल मारू शकेल, याबाबत साशंका आहे. गेल्या वर्षी भारतीय भूमीवर आफ्रिकेने तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत २-० असा विजय मिळवला होता. याशिवाय नुकतीच इंग्लंडविरुद्धची मालिका या संघाने २-० अशी जिंकली आहे. आयपीएलमध्ये भारतात खेळण्याचा अनुभव गाठीशी असलेले ए बी डी’व्हिलियर्स, इम्रान ताहीर, जे. पी. डय़ुमिनी आणि डेल स्टेन यांच्या कामगिरीवर फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाची प्रमुख मदार असेल.

वेस्ट इंडिज (२) 

विजेते : २०१२

गेली काही वष्रे सुरू असलेल्या विंडीजच्या खेळाडूंच्या मानधनाचा प्रश्न अगदी गेल्या महिन्याभरापर्यंत ऐरणीवर होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांत पुरेसा सराव न मिळालेला हा संघ यंदा संभाव्य विजेत्याच्या यादीत गणला जात नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वात मनोरंजक फलंदाज ख्रिस गेल वेस्ट इंडिजच्या संघात आहे. मात्र पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळापेक्षा अन्य वादामुळेच तो गाजला. कप्तान डॅरेन सॅमी, ड्वेन ब्राव्हो आणि आंद्रे रसेल यांच्याकडून संघाला अपेक्षा आहेत. किरॉन पोलार्डने दुखापतीमुळे, तर सुनील नरिन शैली सुधारण्यासाठी स्पध्रेत खेळत नाहीत.

इंग्लंड (५)

विजेते : २०१०

क्रिकेटचा इतिहास गाठीशी असणाऱ्या इंग्लंड संघाने २०१०चे एकमेव ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपद वगळता महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धामध्ये फारशी चमक दाखवलेली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून ट्वेन्टी-२० मालिकेत हार पत्करणाऱ्या इंग्लिश संघासाठी कर्णधार ईऑन मॉर्गनचा फॉर्म ही चिंतेची बाब ठरत आहे. जोस बटलर व बेन स्टोक्स कोणत्याही परिस्थितीत निर्धाराने खेळू शकतात. अ‍ॅलेक्स हेल्स सातत्याने फलंदाजी करीत आहे. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड व अष्टपैलू ख्रिस वोक्स यांना संघात स्थान दिलेले नाही. मात्र दुखापतग्रस्त स्टीव्हन फिन संघात आहे.

गट दुसराह्ण

भारत (१)

विजेते : २००७

उपविजेते : २०१४

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ घरच्या वातावरणात दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावू शकतो. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर ट्वेन्टी-२० मालिकेत नमवल्यानंतर भारतीय संघाने कात टाकली आहे. मग श्रीलंकेविरुद्धची मालिका आणि नुकताच दिमाखात जिंकलेला आशिया चषक हे अनुभव आणि युवा खेळाडूंचा भरणा असणे हे समतोल संघाची ग्वाही देतात. जगातील सर्वोत्तम फिरकी मारा आणि अनुकूल खेळपट्टय़ा भारताच्या पथ्यावर पडू शकतील.

न्यूझीलंड (४)

ट्वेन्टी-२० विश्वचषकाला अनुकूल संघ असूनही या न्यूझीलंडला आतापर्यंत एकदाही उपांत्य फेरीचा अडथळा ओलांडता आलेला नाही. ब्रेंडन मॅक्क्युलमच्या निवृत्तीनंतर केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली किवी संघ सज्ज झाला आहे. न्यूझीलंडने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्या असल्या तरी तेथील आणि भारतातील वातावरण यातील फरक महत्त्वाचा आहे. न्यूझीलंडकडे फलंदाजीचे सामथ्र्य आणि जगातील सर्वोत्तम वेगवान मारा आहे. मार्टिन गप्तिल आणि कॉलिन मुन्रो या सलामीवीरांकडून त्यांना विशेष अपेक्षा आहेत.

पाकिस्तान (७)

विजेते : २००९ ’ उपविजेते : २००७

ट्वेन्टी-२० प्रकारात पाकिस्तान हा सर्वात आव्हानात्मक संघ आहे, हे त्यांनी पहिल्या विश्वचषकात उपविजेतेपद आणि दुसऱ्या विश्वचषकात विजेतेपद मिळवून सिद्ध केले आहे. मात्र आशिया चषकात पाकिस्तानने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे गुणी फलंदाज अहमद शेहझादला विश्वचषकासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. कर्णधार शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हाफीझ आणि शोएब मलिक यांच्यासारखे अनुभवी खेळाडू संघात आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरसह गोलंदाजी बळकट असली, तरी फलंदाजीमध्ये त्यांना सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे.

ऑस्ट्रेलिया (६)

उपविजेते : २०१०

मायभूमीवर भारताकडून ट्वेन्टी-२० मालिकेत हार पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळ खडाडून जागे झाले. दुखापतीसह भारताविरुद्ध खेळणाऱ्या आरोन फिन्चला कर्णधारपदावरून वगळून स्टीव्हन स्मिथच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. याशिवाय मॅथ्यू वेड, कॅमेरून बॉयसे आणि नॅथन लिऑनसारख्या तरबेज खेळाडूंना वगळून पीटर नेव्हिल, अ‍ॅश्टॉन अ‍ॅगर आणि अ‍ॅडम झम्पा यांना संघात घेतले आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील २-१ असा विजय ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडू शकेल. एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक पाच वेळा जगज्जेतेपद नावावर असलेला ऑस्ट्रेलियन संघ पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० जेतेपदासाठी उत्सुक आहे.