Women’s T20 World Cup IND vs NZ : टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा अटीतटीच्या लढतीत ३ धावांनी पराभव केला. सलामीवीर शफाली वर्मा (४६) आणि तानिया भाटीया (२३) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला १३४ धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला केवळ १३० धावाच करता आल्या. भारताने या विजयासह तीन सामने जिंकून ६ गुणांसह स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

भारताकडून सलामीवीर शफाली वर्मा हिने तुफानी खेळी केली. एकीकडे गडी बाद होत असताना शफालीने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. शफाली वर्माने ३४ धावांमध्ये शानदार ४६ धावा केल्या. या खेळीमध्ये तिने ३ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार खेचले. या दमदार खेळीच्या बळावर शफालीने विश्वविक्रम केला. टी २० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करण्याचा विक्रम शफालीने स्वत:च्या नावावर केला. शफालीने आतापर्यंत तीन सामन्यात मिळून १७२.७२ च्या स्ट्राईक रेटने ११४ धावा केल्या आहेत.

तसेच, महिला टी २० क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्तम स्ट्राईक रेटचा (किमान २०० धावा) विक्रमदेखील शफालीने आपल्या नावावर केला. सध्या शफाली टी २० क्रिकेटमध्ये १४७.९७ च्या स्ट्राईक रेटसह ४३८ धावांसह अव्वल आहे. कोल ट्रायॉन १३८.३१ च्या स्ट्राईक रेटने ७२२ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर अलिसा हेली १२९.६६ च्या स्ट्राईक रेटने १ हजार ८७५ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिला बळी लवकर गमावला. स्मृती मानधना ११ धावांवर बाद झाली. स्मृती लवकर बाद झाल्यावर शफाली वर्मा आणि तानिया भाटीया यांनी चांगली भागीदारी केली. त्यानंतर यष्टीरक्षक तानिया भाटीया (२५ चेंडूत २३ धावा) फटकेबाजी करताना झेलबाद झाली. त्यानंतरच्या फलंदाजांनी निराशा केली. मुंबईकर जेमिमा (१०), कर्णधार हरमनप्रीत (१), अनुभवी वेदा कृष्णमूर्ती(६), दिप्ती शर्मा (८) स्वस्तात बाद झाल्या. अखेर राधा यादवने फटकेबाजी करत भारताला १३३ धावांचा टप्पा गाठून दिला.

१३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सलामीवीर प्रिस्ट १२ धावा करून माघारी परतली. पाठोपाठ अनुभवी सुझी बेट्सदेखील त्रिफळाचीत होऊन तंबूत परतली. कर्णधार सोफी डिव्हाईनही १४ धावा करून बाद झाली. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ३४ झाली होती. त्यानंतर मॅडी ग्रीन आणि केटी मार्टीन यांनी डाव सावरला. या दोघींनी ४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अखेर राजश्री गायकवाडने जमलेली जोडी फोडली. फलंदाज मॅडी ग्रीन २४ धावांवर बाद झाली. लगेच केटी मार्टीनही २५ धावा करून माघारी परतली. त्यानंतर अमेलिया किर हिने तुफान फटकेबाजी केली. तिने ६ चौकार लगावत १९ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. पण एका चेंडूत ५ धावा हव्या असताना अखेर न्यूझीलंडला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.