महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात सलामीवीर शफालीची धडाकेबाज ४६ धावांची खेळी आणि तिला तानिया भाटीयाने (२३) दिलेली साथ याच्या बळावर भारताने २० षटकात ८ बाद १३३ धावा केल्या आणि न्यूझीलंडला १३४ धावांचे आव्हान दिले. धडाकेबाज सलामीवीर शफाली वर्मा हिने अप्रतिम खेळ केला. एकीकडे झटपट गडी बाद होताना शफालीने एक बाजू लावून तर धरली. तिला तानिया भाटीयाने चांगली साथ दिली. पण त्यानंतरच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे भारताने ३१ धावांत शेवटचे ५ गडी गमावले.

फटकेबाज सुरूवात करणारी स्मृती मानधना (११) त्रिफळाचीत झाली. स्मृती लवकर बाद झाल्यावर शफाली वर्मा आणि तानिया भाटीया यांनी दमदार फटकेबाजी करत भारताला सातव्या षटकात अर्धशतकी मजल मारून दिली. यष्टीरक्षक तानिया भाटीया फटकेबाजी करताना झेलबाद झाली आणि भारताला दुसरा धक्का बसला. तानियाने २५ चेंडूत २३ धावा केल्या. भारताची धावसंख्या २ बाद ८० होती त्यावेळी धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात मुंबईकर जेमिमाने फटकेबाजी सुरू केली आणि ८ चेंडूत १० धावा करून ती माघारी परतली. त्यानंतर भारतीय संघाने केवळ ३१ धावांत ५ बळी गमावले.

गेल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार हरमनप्रीतला या सामन्यातही सूर गवसला नाही. केवळ १ धाव करून ती बाद झाली. धडाकेबाज खेळी करणारी सलामीवीर शफाली वर्मा हिला अर्धशतकाने हुलकावणी दिली. शफालीने ३४ चेंडूत ४६ धावांची झंजावाती खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकार लगावले. अनुभवी वेदा कृष्णमूर्ती फटका खेळताना चेंडू तिच्या पायावर आदळला. पंचांनी तिला बाद ठरवले नाही, त्यामुळे न्यूझीलंडने DRS चा आधार घेतला. त्यात तिला पायचीत घोषित करण्यात आले. ११ चेंडूत ८ धावा करणारी दिप्ती शर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाली आणि भारताला सातवा धक्का बसला.

अखेर अरूंधती रेड्डीच्या जागी संघात संधी मिळालेल्या राधा यादवने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत भारताला १३३ धावांपर्यंत मजल मारून दिली.