ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल अद्याप आयसीसीने अंतिम निर्णय घेतलेला नाही. ३० सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियात लॉकडाउन जाहीर झालेलं आहे. सरकारने परिस्थितीचा अंदाज घेत काही गोष्टी सुरु करण्याची परवानगी दिली असली तरीही ऑस्ट्रेलियात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. अशा परिस्थितीत विश्वचषकाचं आयोजन करणं अशक्य असल्याचं मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनीही काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं. यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल हसीच्या मते टी-२० विश्वचषकाचं आयोजन करणं हे खरंच कठीण आहे.

“टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल मी खरंच साशंक आहे. एक संघ देशात येऊन त्याला क्वारंटाईन केल्यानंतर मग आंतरराष्ट्रीय सामना खेळवता येणं शक्य आहे. पण विश्वचषकासाठी अनेक संघ ऑस्ट्रेलियात येणार. ते देशात आल्यानंतर त्यांचा क्वारंटाईन काळ, त्यांच्या प्रवासाची सोय, राहणं आणि परतीचा प्रवास या सर्व गोष्टी आताच्या घडीला मला अशक्यप्राय वाटत आहेत. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे यंदाच्या विश्वचषकाचं आयोजन २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात येऊ शकतं”, हसी HotSpot या पॉडकास्टमध्ये बोलत होता.

वर्षाअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळतील. हा दौरा ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडला जाईल असं हसीन म्हटलंय. दरम्यान यंदाचा टी-२० विश्वचषक रद्द झाल्यास बीसीसीआय त्या जागेवर आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवण्याच्या तयारीत आहे.