ऑस्ट्रेलियामध्ये २०२० साली होणाऱ्या T20 World Cup 2020 स्पर्धेवर करोनाचे सावट आहे. एकूण १६ संघ सहभागी होणाऱ्या या स्पर्धेची नोव्हेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. पण करोनाच्या तडाख्यामुळे सध्या तरी टी २० विश्वचषक स्पर्धा २०२० लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. ICC च्या क्रिकेट समितीची नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात टी २० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावरदेखील चर्चा झाली. त्यानुसार टी २० विश्वचषक हा नियोजित ओक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत खेळवणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.

ICC चा प्रशासकीय कारभार पाहणारे अधिकारी, इतर कर्मचारी वर्ग आणि स्पर्धेचे यजमानपद असलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता अधिक तीव्र झाली आहे. करोनामुळे दर चार वर्षांनी आयोजित करण्यात येणारी ऑलिम्पिक स्पर्धादेखील आता २०२० ऐवजी २०२१ मध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर आता टी २० विश्वचषक स्पर्धादेखील पुढे ढकलण्याचा विचार केला जात असून ICC कडून पुढील आठवड्यात याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याचे टाईम्स ऑफ इंडियाचे वृत्त आहे.

तीन पर्यायांची चर्चा

१. क्रिकेट ऑस्ट्रेलिया फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान टी २० विश्वचषकाचे आयोजन करू शकते. पण त्या काळात असलेला इंग्लंडचा भारत दौरा आणि त्यानंतर IPL 2021 चे आयोजन करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत स्टार इंडियाला भारताच्या उभय देशांतील मालिकेच्या प्रसारणाचे हक्क आणि ICC च्या स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क अशा दोन्ही गोष्टी देणे याला ब्रॉडकास्टर्स विरोध करू शकतात.

२. २०२१ च्या टी २० क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये २०२१ च्या विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला देऊन २०२२ चे टी २० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारत स्वत:कडे घेण्याचा पर्याय आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आताच क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मदत करत आहे. अशा परिस्थितीत विश्वचषक स्पर्धांच्या आयोजनाची आदलाबदली करण्यास भारत कितपत तयार होईल याबाबत साशंकता आहे.

३. ऑस्ट्रेलियाने थेट २०२२ चा विश्वचषक आयोजित करण्याचा विचार करावा. कारण ICC ने २०२२ मधील मोठ्या स्पर्धांच्या घोषणा अद्याप तरी केलेल्या नाहीत.

टी २० विश्वचषक स्पर्धेत यजमान संघ (ऑस्ट्रेलिया) आणि जागतिक टी २० क्रमवारीतील सर्वोत्तम नऊ संघ असे मिळून दहा संघांना थेट प्रवेश देण्यात आला होता. तर पात्रता फेरीतील सामन्यांनंतर आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स, पापुआ न्यू गिनी, ओमान व स्कॉटलंड या देशांना स्पर्धेचे तिकीट मिळाले. T20 World Cup 2020 च्या फॉरमॅटनुसार आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स, ओमान, पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड या सहा संघांना पहिल्या फेरीत दोन वेगवेगळ्या गटात क्रमवारीतील नवव्या आणि दहाव्या स्थानी असलेल्या संघांविरूद्ध खेळावे लागणार आहे. त्यानंतर या दोन गटातील सर्वाधिक गुण मिळवलेला प्रत्येकी १ संघ आणि क्रमवारीतील ८ संघ यांच्यात T20 World Cup 2020 स्पर्धेचे मूळ सामने रंगणार आहेत.