मुंबई इंडियन्सच्या संघाने इंडियन प्रिमियर लीगसोबतच टी-२० विश्वचषकामध्येही आपली छाप सोडली आहे. विश्वचषकासाठी निवड करण्यात आलेल्या १५ सदस्यांच्या टीमध्ये मुंबई इंडियन्सच्या ६ खेळाडूंना स्थान मिळालं आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मासोबतच सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, जसप्रीत बुमरा, ईशान किशन आणि राहुल चाहरचा समावेश आहे. विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यापूर्वी भारतीय खेळाडू १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान आय़पीएल २०२१ चे उर्वरित सामने खेळणार आहेत.

रोहित शर्माने आपल्या नेतृत्वामध्ये सर्वाधिकवेळा म्हणजेच पाच वेळ संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिलं आहे. २०२० चं आयपीएलचं संपूर्ण पर्व यूएईमध्ये खेळवण्यात आलं. त्यावेळेही मुंबईनेच जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळेच या संघातील सर्वाधिक खेळाडू भारतीय क्रिकेट टीममध्ये असल्याने त्याचा भारतीय संघाला फायदा होणार आहे. विश्वचषकाच्या दोन दिवसआधीच आयपीएलचा जवळजवळ एक महिना चालणारा सिझन संपणार असल्याने खेळाडूंना दुबईमधील खेळपट्ट्यांचा चांगला सराव होईल. रोहित शर्मा सलामीवीर म्हणून भारतीय संघाला चांगली सुरुवात देऊ शकतो. तर सूर्यकुमार यादव, ईशान किशन मधल्या फळीला मजबूत बनवतात. तसेच हार्दिक पंड्या शेवटच्या काही षटकांमध्ये वेगाने धावा जमवण्यात माहीर आहे.

नक्की वाचा >> T20 World Cup: निवृत्तीनंतरही टीम इंडियामध्ये धोनीचं ‘सिलेक्शन’; ‘या’ निर्णयामागील रजनीकांत कनेक्शन माहितीय का?

कशी राहिलीय या खेळाडूंची कामगिरी?

२०२० चं आयपीएलचं संपूर्ण पर्व युएईमध्ये खेळवण्यात आलं. त्यावेळेच आकडे पाहिल्यास सूर्यकुमार यादवने १६ सामन्यांमध्ये १४५ च्या सरासरीने ४८० धावा केल्या होत्या. यामध्ये चार अर्धशतकांचाही समावेश होता. रोहित शर्माने याच पर्वात ३३२ तर हार्दिक पांड्याने २८१ धावा केल्या होत्या. हार्दिकचा स्ट्राइक रेट १७९ इतका होता. गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास बुमराने १५ सामन्यांमध्ये १५ च्या सरासरीने २७ बळी घेतले होते. त्याचा इकनॉमी रेट सातपेक्षाही कमी होता. राहुल चाहरने १५ सामन्यांमध्ये १५ बळी घेतले होते. ईशान किशनच्या बॅटमधूनही धावांचा पाऊस पडला होता. त्याने या पर्वात ५०० हून अधिक धावा कुटल्या होत्या.

नक्की पाहा हे फोटो >> विराटला त्या सेलिब्रेशनमुळे ‘Classless’ म्हणणाऱ्या ब्रिटीश मीडियाचा जाफरने उतरवला माज

मुंबईकरांना डच्चू….

सलामीवीर पृथ्वी शॉ, धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर या मुंबईकरांना संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातून डावलण्यात आले आहे. सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनाही अनपेक्षित डच्चू मिळाला आहे. शार्दूल आणि श्रेयस यांची राखीव खेळाडू म्हणून वर्णी लागली आहे. शार्दूलने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतके झळकावली आणि गोलंदाजीतही छाप पाडताना दुसऱ्या डावात रॉरी बर्न्‍स आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटचा अडसर दूर केला. मर्यादित षटकांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील पृथ्वीची गेल्या वर्षभरातील कामगिरी लक्षवेधी होती. ‘आयपीएल’मध्ये दुखापत झालेल्या आक्रमक श्रेयसची कामगिरी निवड समितीचे लक्ष वेधू शकली नाही.

नक्की पाहा हे फोटो >> आईच्या भीतीपोटी लागलेल्या सवयीमुळे बुमरा आज झालाय ‘यॉर्कर किंग’

विराटकडे लक्ष

टी २० विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच धोनी वगळता इतर कोणताही खेळाडू भारताचे नेतृत्व करणार आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही पहिलीच टी-२० विश्वचषक स्पर्धा असणार आहे. भारतीय संघाने २००७ नंतर टी २० विश्वचषक जिंकलेला नाही. इतकच नाही तर २०१३ नंतर भारताने आतापर्यंत आयसीसीचा एकही चषक जिंकलेला नाही. दुसरीकडे विराट कोहली त्याच्या नेतृत्वामध्ये अद्याप आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेला नाही. त्यामुळेच विराटच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. आधी ही मालिका भारतात खेळवली जाणार होती. मात्र करोना रुग्णसंख्या लक्षात घेता ही मालिका ओमान आणि यूएईमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबदरम्यान आयोजित करण्यात आलीय.

भारतीय संघ

’  फलंदाज : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव

’  यष्टीरक्षक : ऋषभ पंत, ईशान किशन

’  अष्टपैलू : हार्दिक पंडय़ा

’  वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

’  फिरकीपटू : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर

’  राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर