राधिका सकपाळ, पृथा वर्टीकर या पुण्याच्या खेळाडूंनी अजिंक्यपद मिळवीत राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. दक्ष जाधव (जळगाव), जश मोदी, दिव्या चितळे व देव श्रॉफ (मुंबई उपनगर) यांनीही आपापल्या गटात विजेतेपद मिळविले.
सिम्बायोसिस क्रीडा केंद्रात सुरू असलेल्या या स्पर्धेतील १० वर्षांखालील गटात राधिका हिने मुंबई शहर संघाच्या ग्लोरिया जॉर्ज हिच्यावर ११-४, ८-११, ११-६, ११-५ अशी मात केली. मुलांमध्ये जाधव याला विजेतेपदासाठी झुंजावे लागले. त्याने उत्कंठापूर्ण लढतीत नील मुळय़े या स्थानिक खेळाडूवर १२-१०, ११-३, ८-११, १०-१२, १२-१० असा रोमहर्षक विजय नोंदविला. त्याने टॉपस्पीन फटक्यांचा सुरेख खेळ केला. मुलींच्या १२ वर्षांखालील गटात पृथा हिने आपल्या विजेतेपदांमध्ये आणखी एका विजेतेपदाची भर घातली. तिने मुंबई उपनगरच्या संपदा भिवंडीकर हिला १२-१०, ११-८, ११-६ असे हरविले. मुलांमध्ये मोदी याला राजवीर शहा (मुंबई उपनगर) याने चांगली झुंज दिली. मोदी याने हा सामना ९-११, ११-९, ११-९, ८-११, ११-९ असा जिंकला. सबज्युनिअर मुलांच्या गटात श्रॉफ याने अंतिम फेरीत जश जोबालिया (मुंबई उपनगर) याचा ११-५, ११-७, ११-६, ११-७ असा सरळ चार गेम्समध्ये पराभव केला. त्याने काऊंटर अ‍ॅटॅक तंत्राचा बहारदार खेळ केला. मुलींच्या विभागात दिव्या हिने अंतिम सामन्यात अदिती सिन्हा (मुंबई उपनगर) हिला ११-९, १११-८, १२-१०, १२-१० असे पराभूत केले. तिने परतीचे सुरेख फटके मारले.