आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षवर गेल्या १३ वर्षांपासून विराजमान असणारे पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना सोमवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. कतार अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष व आशियाई महासंघाचे विद्यमान उपाध्यक्ष दहलान जुम्मान अल हमाद यांनी कलमाडींच्या साम्राज्याला शह दिला. अल हमाद यांनी कलमाडींवर २०-१८ असा केवळ दोन मतांनी विजय मिळवून अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान पटकावला.
कलमाडी हे २०००मध्ये आशियाई महासंघाच्या अध्यक्षपदी निवडून आले होते. आपल्या १३ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी आशियाई ग्रां. प्रि. शर्यत, आशियाई ऑल स्टारसारख्या अनेक नवनवीन स्पर्धा सुरू केल्या होत्या. त्यामुळे ते पुन्हा विजयी होतील, अशी कलमाडी गटाला खात्री होती. पण पुण्यातील राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा आणि २०१०मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आर्थिक गैरव्यवहार कलमाडींना भोवला. सध्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली चौकशी सुरू असलेल्या कलमाडी यांना तुरुंगवास भोगावा लागला आहे. आशियाई महासंघाच्या अध्यक्षपदी स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती असावी, असा प्रवाह महासंघाच्या प्रतिनिधींमध्ये निर्माण झाला होता.
त्यामुळेच कलमाडी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. देशातीलच नव्हे तर आशियाई महासंघावर निर्विवादपणे वर्चस्व गाजवणाऱ्या कलमाडी यांचे साम्राज्य खालसा होऊ लागले आहे, हेच यातून दिसून येतेय
आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे (आयएएएफ) अध्यक्ष लॅमेन दियाक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पुण्यात ही निवडणूक घेण्यात आली. आशियाई महासंघाचे सदस्य असलेल्या ४५ देशांना प्रत्येकी एक मत देण्याचा हक्क होता. सर्व सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला, मात्र सात मते बाद झाली. अल हमाद यांना अरेबियन देशांची १२ मते मिळालीच, पण त्याचबरोबर त्यांना पूर्व आशियाई देशांचीही काही मते मिळाली. त्यांनी गेले दोन महिने या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली होती.
मला निवडून दिले तर आणखी प्रायोजक मिळवून देण्याबरोबरच आशियाई खेळाडूंसाठी भरघोस आर्थिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन अल हमाद यांनी दिले होते. अनेक देशांच्या अ‍ॅथलेटिक्स संघटकांबरोबर चर्चा केल्याचा फायदा अल हमाद यांना या निवडणुकीत झाला.
अल हमाद यांची अध्यक्षपदाची मुदत दोन वर्षे राहणार आहे. नवीन नियमावलीनुसार, आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षांच्या मुदतीनुसार हे पद राहणार आहे. आयएएएफचे अध्यक्ष लॅमेन दियाक यांच्या अध्यक्षपदाची मुदत २०१५मध्ये संपणार आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव मी खिलाडूवृत्तीने स्वीकारला आहे. आता खूप मोकळे झाल्याचे वाटत आहे. आता अ‍ॅथलेटिक्सच्या पायाभूत विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. अल हमाद यांना त्यांच्या विविध योजनांकरिता माझे पूर्ण सहकार्य राहील. मला आता देशातील क्रीडा क्षेत्राकडे लक्ष देण्यास भरपूर वेळ मिळणार आहे. त्यामुळे निवृत्त होण्याचा प्रश्नच येत नाही.
– सुरेश कलमाडी

कारकीर्द संपुष्टात.. : आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप ठेवण्यात आल्यानंतर कलमाडी यांनी देशातील क्रीडा क्षेत्रातून आपण निवृत्ती स्वीकारत असल्याचे जाहीर केले होते. आता आशियाई महासंघाचे अध्यक्षपद त्यांच्याकडून गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची कारकीर्द संपुष्टात येणार आहे. महासंघाच्या नियमावलीनुसार, माजी अध्यक्षाला आजीव अध्यक्षपद देण्यात येते. मात्र त्यांना मतदानाचा हक्क नसतो तसेच अन्य कोणतेही अधिकार नसतात.