मेट्रो रेल्वेचा विकास करताना आझाद आणि ओव्हल मैदानांची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा, या मैदानांवरील अनेक क्लब आणि शेकडो खेळाडूंचे नुकसान होईल, असे मत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त करून क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री विनोद तावडे यांचे लक्ष वेधले.
महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी आगामी काळात राज्याचा क्रीडा नकाशा तयार करणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. मोहन बने यांच्या ‘चॅम्पियन्स’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ सभागृहात झाले.
‘‘प्रत्येक मुलामुलीने मैदानी खेळ खेळावेत. यासाठी त्यांना टीव्हीसमोरून उठवून मैदानात खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. प्रत्येक तालुक्यातील क्रीडा संकुलांचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी येत्या काळात शासनातर्फे प्रयत्न केले जातील,’’ असे तावडे यांनी सांगितले.
‘‘नवीन चॅम्पियन्स घडण्यासाठी खेळाची मैदाने टिकली पाहिजेत. हल्लीच्या मॅटवरच्या खेळांमुळे शहरी मुलांचा मातीशी संबंध तुटत चालला आहे,’’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या वेळी माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे, अमोल मुझुमदार, आदी मान्यवर उपस्थित होते.