महाराष्ट्रामध्ये मानाची समजली जाणारी ‘तळवलकर क्लासिक’ शरीरसौष्ठव राष्ट्रीय स्पर्धा १६ ते १७ डिसेंबर या कालावधीमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत देशातील अव्वल ३० शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने देशामध्ये पहिल्यांदाच मिश्र जोडीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पाच लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार असून एकूण १६ लाखांची रोख पारितोषिके या स्पर्धेत देण्यात येणार आहेत.
मिश्र जोडी स्पर्धा कशी होणार
मि. युनिव्हर्स स्पर्धेत एका दाम्पत्याला सराव करताना पाहून मधुकर तळवलकर यांना ही स्पर्धा घेण्याचे सुचले. या स्पर्धेत एक पुरुष आणि एक महिला शरीरसौष्ठवपटूंचा समावेश असेल. यामध्ये पुरुष शरीरसौष्ठवपटू राष्ट्रीय स्तरावरील असेल, तर महिला स्पर्धेत फिजिक आणि फिटनेस विभागातील असेल. या जोडीला ९० सेकंदांचा अवधी दिला जाईल, त्यामध्ये त्यांना सादरीकरण करावे लागेल. आतापर्यंत किमान सहा जोडय़ांनी या स्पर्धेत सहभाग निश्चित केला आहे.
या गटातील विजेत्याला एक लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

स्पर्धकांची निवड प्रक्रिया
या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्पर्धामधल्या विजेत्यांची स्पर्धेसाठी निवड केली जाते. त्याचबरोबर ज्या स्पर्धकांचे जेतेपद अंशत: फरकाने निसटते, त्यांनाही या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी निमंत्रण दिले जाते. आतापर्यंत ३० शरीरसौष्ठवपटूंची स्पर्धेसाठी निवड झाली असून यापैकी २६ खेळाडूंनी उपलब्धता दर्शवली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ३० स्पर्धकांची चाचणी घेण्यात येईल आणि अंतिम फेरीसाठी १० स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे.