अभिनव मुकुंद (६), मुरली विजय (०), एस. बद्रिनाथ (०) आणि बाबा अपराजित (२३) तसेच दिनेश कार्तिक (२९) हे अव्वल पाच फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर रामास्वामी प्रसन्ना आणि यो महेश यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळीमुळे तामिळनाडूने डाव सावरला. मात्र तामिळनाडूची रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी घरच्या मैदानावर ९ बाद २७३ अशी दमछाक झाली आहे.
श्रीकांत मुंढे, समद फल्लाह यांच्या वेगवान माऱ्यासमोर तामिळनाडूची भंबेरी उडाली. विजय आणि बद्रिनाथला खाते खोलण्याचीही संधी मुंढेने दिली नाही. त्यामुळे त्यांचे पाच फलंदाज अवघ्या ८७ धावांत तंबूत परतले. प्रसन्ना आणि महेश यांनी ११० धावांची भागीदारी रचत तामिळनाडूला सावरले. मात्र फिरकीपटू अक्षय दरेकरने दोघांचाही त्रिफळा उडवत तामिळनाडूला आणखी अडचणीत आणले. प्रसन्नाने ५६ तर महेशने ८१ धावा फटकावल्या. फल्लाह याने नंतर दोन बळी मिळवले. दिवसअखेर मलोलान रंगराजन ५० तर औशिक श्रीनिवास ४ धावांवर खेळत आहे.